गाय तस्करीच्या संशयावरून मारहाण, २७ जणांवर गुन्हा दाखल
By सदानंद सिरसाट | Published: February 10, 2024 05:09 PM2024-02-10T17:09:09+5:302024-02-10T17:09:57+5:30
अटक केलेल्यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
खामगाव (बुलढाणा) : वाहनातून गायीची तस्करी होत असल्याच्या संशयावरून तालुक्यातील सजनपुरी येथील गंगा धाबा चौफुलीजवळ गायीचा मालक आणि वाहनचालकाला शुक्रवारी रात्री जबर मारहाण केल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी खामगावातील २७ जणांवर भादंविसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी ८ जणांना पोलिसांनी शनिवारी पहाटेच अटक केली.
अटक केलेल्यांना न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसात दाखल तक्रारीनुसार तालुक्यातील माथनी येथील कैलास सीताराम तायडे (५०) हा त्याची लाल धामणी रंगाची गाय वाहन क्रमांक एमएच २८ - २४३४ मध्ये टाकून माथणी येथून खामगावातील शौकत कॉलनी येथे घेऊन जात होता. शहरातील गंगा ढाबा चौफुलीवर वाहन आले असता त्या ठिकाणी त्याच्या ओळखीच्या व्यक्तीने काही गैरकायद्याची मंडळी जमविली. तसेच गाय कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचा आरोप करीत त्याला लाठीकाठीने मारहाण करून वाहनाची तोडफोड केली. यावेळी हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळताच त्यांनी जखमींना तातडीने खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी मारहाण करणे, दंगलीच्या गुन्ह्यांसह ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये गब्बू किशन गुजरीवाल, सोनू कौशल, मंगेश सावरकर, अनिल बेनिवाल, नारायण सावरकर, आकाश गोसावी, आकाश सावरकर, राजेश भगतपुरे, गणेश गोसावी, राजेश बेनिवाल, विनायक नाइकवाड, संजय बेनिवाल, गोलू सावरकर, लखन बेनिवाल, पंकज बेनिवाल, शंकर गोसावी, राधेशाम गोसावी व इतर १० अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे.
हल्ला केल्यानंतर पळून गेलेल्यांपैकी किसन उर्फ गोलू लक्ष्मण सावरकर (२४), राधेश्याम महादेव गोसावी (२५), मंगेश हिरा सावरकर (२८), गणेश महादेव गोसावी (३१), नारायण रामू सावरकर (३२), शंकर रामा गोसावी (२४), लखन राजू बेनिवाल (२५), पंकज महादेव बेनिवाल (२४, सर्व राहणार सजनपुरी) यांना अटक केली. न्यायालयात हजर केले असता १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या घटनेत आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे, जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.