जनुना तलावाच्या सौंदर्यीकरणास सुरवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 03:37 PM2019-07-14T15:37:27+5:302019-07-14T15:37:36+5:30
लोकमत जलसंवर्धन अभियानाच्या माध्यमातून खामगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या जनुना तलावाच्या खोलीकरणाचा व सौंदर्यीकरणाचा मुद्दा उचलून धरला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: लोकमत जलसंवर्धन अभियानाच्या माध्यमातून खामगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या जनुना तलावाच्या खोलीकरणाचा व सौंदर्यीकरणाचा मुद्दा उचलून धरला होता. याची दखल घेत भारतीय जैन संघटनेसह रोटरी क्लबने खोलीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. यामुळे तलावातील ८५ हजार ब्रॉस काळ उपसण्यात आला. शेतकऱ्यांनी हा गाळ शेतात नेल्याने जमिन सुपीक होण्यास मदत झाली. गाळ काढल्याने २० कोटी लिटर पाणी साठवण क्षमतेत वाढ झाली. रविवारी, १४ जुलैरोजी याठिकाणी शिवशंभो ग्रुपच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. एकाचवेळी २५० रोपट्यांची लागवड याठिकाणी आमदार अॅड. आकाश फुंडकर, वसुंधरा फाउंडेशनचे संचालक सागर फुंडकर व नगराध्यक्ष अनिता डवरे, शिवशंभो ग्रुपच्या सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी उपक्रमाची प्रशंसा करून बगिचाच्या सौंदर्यीकरणासोबत तलावात बोटींग सुविधा व लहान मुलासाठी वॉटर पार्कसह खेळण्याची साध़ने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असे सांगितले. नगराध्यक्षा अनिता डवरे यांनी सुद्धा यावेळी मनोगतातून जनुना तलावाचे संवर्धन करण्याचे आवाहन नागरिकांना केले. शिवशंभो ग्रुपचे संतोष डिडवाणिया यांनी तलाव परिसरात लावण्यात आलेल्या झाडांचे संवर्धनासोबतच झाडाचा वाढदिवस साजरा करून दरवर्षी याच ठिकाणी नवनविन झाडे लावण्याचा निर्धार केला असल्याची माहिती दिली. तर वसुंधरा फाउंडेशनचे अध़्यक्ष सागर फुंडकर यांनी तलाव परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे आवाहन केले. यावेळी शिवशंभो ग्रुपचे अध्यक्ष सावरमल शर्मा, संतोष डिडवाणिया, अमीत गोयनका, शशिकांत सुरेका, संजय मोहिते, राम मोहिते पाटील, रोटरी क्लब, लायन्स क्लब, शिवनेरी ग्रुप, वृक्षप्रेमी, नागरिक उपस्थित होते.