‘ब्युटी विथ ब्रेन’ सौंदर्य स्पर्धेचा गाभा! - गितांजली भोसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 07:14 PM2019-11-23T19:14:39+5:302019-11-23T19:14:44+5:30
प्रसंगावधान यावर सौंदर्य स्पर्धेचे यशापयश अवलंबून असते असे मत हैद्राबाद येथील योगतज्ञ तथा २०१७ च्या मिसेस इंडिया (नॉर्थ)गितांजली भोसरकर यांनी व्यक्त केले.
- सोहम घाडगे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: सौंदर्य स्पर्धेत केवळ सुंदरता बघितली जाते असा समज आहे. वास्तविक परिस्थिती तशी नसून सौंदर्यासोबत गुणवत्ता तितकीच महत्वपूर्ण आहे. विचारलेल्या प्रश्नांना स्पर्धक कशाप्रकारे उत्तरे देतो यावरुन त्याच्या गुणवत्तेचा अंदाज येतो. एकंदर परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्याची क्षमता, प्रसंगावधान यावर सौंदर्य स्पर्धेचे यशापयश अवलंबून असते असे मत हैद्राबाद येथील योगतज्ञ तथा २०१७ च्या मिसेस इंडिया (नॉर्थ)गितांजली भोसरकर यांनी व्यक्त केले. प्रगती वाचनालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमानिमित्त बुलडाणा येथे आल्या असता २३ नोव्हेंबर रोजी त्याच्यांशी साधलेला संवाद...
सौंदर्य स्पर्धेकडे कशा वळल्या?
आरोग्यासाठी योगसाधना अत्यंत महत्वाची आहे. शरीर निरोगी असल्यास आपोआप सौंदर्य खुलते. योगाभ्यास, योगातज्ञ म्हणून काम करीत असतांना सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली. तयारी करण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. अल्पावधीत म्हणजे केवळ २० दिवसांमध्ये तयारी केली. परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर स्पर्धेत यश मिळाले. सौंदर्य स्पर्धेतून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या.
सैन्यातील महिलांसाठी काम करताना अनुभव कसा आहे ?
सैन्यातील अधिकारी, जवान यांच्या कुटूंबातील महिलांसाठी काम करतांना खरच खूप आनंद मिळतो. स्वत: सैनिक कुटूंबातील असल्याने या महिलांबद्दल आपुलकी आहे. त्यांच्यासाठी शिक्षण, व्यवसाय मार्गदर्शन, मनोरंजन, कला आदी उपक्रम राबवितांना कुठेतरी मनाला समाधान मिळते.
सौंदर्य स्पर्धेत तुम्हाला विचारलेला एखादा प्रश्न आणि तुमचे उत्तर सांगा ?
सहभागी स्पर्धकांपेक्षा तुमच्यातील वेगळेपण काय असा प्रश्न परिक्षकांनी विचारला. त्यावर मी आर्मीतील महिलांसाठी करीत असलेले काम इतरांपेक्षा प्लस पॉर्इंट असे उत्तर दिले. सौंदर्य स्पर्धेत केवळ झगमगाट असतो म्हणून येऊ नका. मेहनत, परिश्रम करण्याची तयारी ठेवा. या स्पर्धांमध्ये गुणवत्तेचा कस लागतो. मंचावर अगदी प्रामाणिक राहा. ज्या गोष्टी अवगत आहेत ते खरे -खरे सांगा. नाहीतर फसगत होण्याची शक्यता असते. विचारलेल्या प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरे दिल्यास यश तुमचेच आहे.
करिअर आणि कुटूंब याची सांगड कशी घातली ?
मी पंजाबी कुटूंबातील आहे. महाराष्ट्रीयन सैनिकी अधिकाºयाशी लग्न केल्यानंतर मराठी संस्कृतीसोबत जुळवून घेतले. पती आणि सासरचा भक्कम पाठींबा आहे. करिअरबाबत त्यांनी पूर्ण मोकळिक दिली. त्यामुळे करिअरमध्ये बेस्ट देता आले. पतीच्या नोकरीनिमित्त सध्या आम्ही हैद्राबाद येथे राहतो. सासरची मंडळी मूळची पुण्याची असली तरी हल्ली इंदौरमध्ये स्थायिक आहेत. छान कौटूंबिक वातावरण आहे. पतीने कधी भाषेचा आग्रह धरला नाही. मला मराठी उत्तम कळते. मात्र बोलता येत नाही. मराठी भाषा छान आहे. मराठी शिकण्याला मी प्राधान्य देणार आहे.