काेराेना रुग्णांसाठी जिल्ह्यात बेड्स उपलब्ध, पण पैसे माेजून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:37 AM2021-03-23T04:37:12+5:302021-03-23T04:37:12+5:30
बुलडाणा : शहरासह जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेनाचा कहर सुरूच आहे. रुग्णसंख्या वाढतच असताना रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण कमी ...
बुलडाणा : शहरासह जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेनाचा कहर सुरूच आहे. रुग्णसंख्या वाढतच असताना रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे, सरकारी काेविड रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध असले तरी त्यासाठी सर्वसामान्यांना पैसे माेजावे लागत आहेत.
कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत असून, पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. त्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत शासकीय रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयात धाव घेत आहेत, परंतु खासगीत पैसे मोजूनच खाटा उपब्ध होत असल्याने रुग्णांची लूट सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मार्च महिन्यात कोरोनाने धुमाकूळ घातला असून मागील वीस दिवसांत आतापर्यंत रेकॉर्डब्रेक रुग्ण आढळून आले.
त्यामुळे शासकीय व खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल होत आहेत. वाढती रुग्णसंख्या आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे सर्वोपचार रुग्णालयात सुविधांचा अभाव दिसून येत आहे. जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांमध्ये २ हजार ८४० ऑक्सिजनची सुविधा असलेले बेड्स आहेत तर २ हजार २३३ बेड्स ऑक्सिजन व्यतिरिक्त आहेत. तसेच खासगी रुग्णालयांमध्ये २ हजार २२४ बेड उपलब्ध आहेत. सरकारी काेविड केअर सेंटर हाऊसफुल्ल झाले आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध असले तरी त्यासाठी पैसे माेजावे लागत आहेत.
खासगी रुग्णालयांकडून लूट
शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधांचा अभाव असल्याने काेराेना पाॅझिटिव्ह रुग्ण खासगी रुग्णालयांकडे धाव घेत आहेत. या संधीचा लाभ घेत काही खासगी रुग्णालये रुग्णांकडून हजाराे रुपयांचे बिल काढून आर्थिक लूट करीत आहेत. खासगी रुग्णालयांच्या तक्रारी हाेऊनही कारवाई करण्यात येत नसल्याचे चित्र आहे. शासनाने दर ठरवून दिले असले तरीही काही खासगी रुग्णालये रुग्णांकडून माेठ्या प्रमाणात बिल वसूल करीत आहेत.
४००० रुपयांपासून सुरूवात
खासगी काेराेना रुग्णालयांमध्ये चार हजार रुपये प्रतिदिवस याप्रमाणे दर आकारण्यात येतात. रुग्णाला ऑक्सिजन लावण्यात आल्यास एक हजार रुपये अतिरिक्त दर आकारण्यात येताे. तसेच व्हेंटिलेटर व आयसीयूचे दरही वेगवेगळे आहेत. त्यामुळे, एकदा खासगी रुग्णालयात रुग्ण दाखल झाला की त्याला हजाराे रुपयांचे बिल देण्यात येते.