लोणार सरोवरातील पाण्याच्या रासायनिक पृथ:करणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 04:01 PM2019-09-15T16:01:47+5:302019-09-15T16:05:19+5:30
लोणा सरोवरातील पाण्याची जुनी गुणवत्ता व आताची गुणवत्ता याचा तुलनात्मक अभ्यास या माध्यमातून करण्यात येणार आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : लोणार सरोवर व लगतच्या परिसरातील पाण्याचे नमुने गोळाकरून सरोवरातील पाणी आणि भूजलाच्या पाण्याचा काही संबंध आहे का? तथा गत काळातील यासंदर्भातील तुलनात्मक आकडेवारी संकलीत करून त्याचा अहवाल खंडपीठात चार आॅक्टोबर रोजी सादर करण्याच्या देण्यात आलेल्या निर्देशानुसार भूजल सर्व्हेक्षण विभागाने वनविभागाच्या सहकार्याने काम सुरू केले आहे.
दरम्यान, लोणार सरोवरातील पाण्याचे रासायनिक पृथ:करण करण्यासोबतच सरोवरात जाणाऱ्या गोड्या पाण्यामुळे त्यावर काही परिणाम झाला आहे का? यासोबतच रासायनिक गुणवत्तेचा अभ्यास करण्यास सोबतच पाण्याची जुनी गुणवत्ता व आताची गुणवत्ता याचा तुलनात्मक अभ्यास या माध्यमातून करण्यात येणार आहे.
लोणार सरोवर विकास व संवर्धनाच्या दृष्टीने नागपूरच्या खंडपीठात एक याचिका दाखल झाली आहे. त्याच्या सुनावणी दरम्यान असा अभ्यास करण्यासाठी भूजल सर्व्हेक्षण विभागासही त्यात प्रतिवादी करण्यात आले आहे. त्यानुषंगाने हा अभ्यास आता सुरू करण्यात आले असल्याचे भूजल सर्व्हेक्षण विभागातील सुत्रांनी स्पष्ट केले आहे.
प्रारंभी भुजल सर्व्हेक्षण विभागाने लोणार सरोवरातील पाण्याचे नमुने तथा लोणार सरोवराच्या साडेसहा किलोमीटर परिघातील विहीरी, बोअरवेलचे पाण्याचे नमुने घेऊन त्याचा अभ्यास करत अनुषंगीक रासायनिक तपासण्या केल्या होत्या. त्याचा सविस्तर अहवाल २३ आॅगस्ट रोजी नागपूर खंडपीठात सादर केला होता. त्यावेळी सरोवरातील पाणी आणि लगतच्या साडेसहा किमी परिसरातील भुगर्भातील पाण्याचा तसा संबंध नसल्याचा निष्कर्ष जीएसडीएने काढला होता.
त्यानुषंगाने खंडपीठाने लोणार सरोवरातील पाण्याची रासायनिक गुणवत्ता अभ्यासन्यासोबतच जुनी गुणवत्ता व आताची गुणवत्ता नेमकी कशी आहे किंवा होती याचा अभ्यास करण्याबाबत सुचीत केले होते.
त्यासंदर्भाने वनविभागाने सरोवरातील पाण्याचे नमुने गोळाकरून ते भुजल सर्व्हेक्षण विभागाला देण्यात येऊन त्याचा तुलनात्मक अभ्यास करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
लोणार सरोवर विकास व संवर्धनाच्या दृष्टीने हा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून पुढील काळात येथे विविध उपाययोजना आणि सरोवर परिसराच्या शास्त्रीय दृष्टीकोणातून विकास करण्याच्या दृष्टीने ही बाब उपयुक्त ठरणार असल्याचे भूजल सर्व्हेक्षण विभागातील सुत्रांनी सांगितले. यासोबतच लोणार येथे हायड्रोमेट्रॉलॉजिकल रिजनल स्टेशन उभारण्याबाबतही नागपूर खंडपीठाने शासनास निर्देश दिले आहेत. त्यादृष्टीने हाता जिल्हा प्रशासनास हालचाली कराव्या लागणार आहे. लोणार सरोवर परिसराचा विकास व संवर्धन होत नसल्याची ओरड होती. त्यानुषंगाने नागपूर खंडपीठात याप्रश्नी याचिका दाखल करण्यात आलेली असून त्याच्या सुनावणीत उपरोक्त निर्देश देण्यात आले होते. याबाबत २८ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांनीही बैठक घेतली.
स्वयंचलीत हवामान केंद्र गरजेचे
खंडपीठाने लोणार सरोवर परिसरात हायड्रोमॅट्रोलॉजिक रिजनन स्टेशन अर्थात स्वयंचलित हवामान केंद्र असणे गरजेचे असून त्यादृष्टीने यंत्रणांनी काम करावे, असे यासंदर्भातील एका प्रोसेडींगमध्ये स्पष्ट केले असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील सुत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले. दरम्यान त्याद्वारे लोणार सरोवर परिसरातील बाष्पीभवन, पाऊस, तापमान, आर्द्रता, हवेची गती याचा डाटा संकलीत होण्यास मदत होणार आहे.
तज्ज्ञ संस्थेची बैठक
संदर्भीय विषयान्वये २८आॅगस्ट रोजी लोणार सरोवर व क्षती प्रतिबंधक तथा संवर्धन समितीची बैठक घेण्यात येऊन खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार करावयाच्या कार्यवाहीबाबत प्रोसेडींगनुसार सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली आहे. सोबतच भारतीय पुरातत्व विभागाने लोणार पर्यटनाचा एकात्मिक आराखडा तयार करण्यासाठी विशेष ज्ञान असलेल्या तज्ज्ञ संस्थेची बैठक घेण्याबाबतच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाली आहे.
आॅक्टोबरमध्ये अहवाल
लोणार सरोवरातील पाण्याचा पीएच नेमका किती; पाण्याचा टीडीएस किती याचेही पृथ:करण करण्यात येत असून प्रदुषण रोखण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करायच्या यासाठी या बाबींचा लाभ होणार आहे. तसेच सध्याचा करंट डाटा आणि पूर्वी उपलब्ध असलेला डाटा याची तुलनाकरून झालेल्या परिणाम याची पाहणी करून पुढील उपाययोजना करणे यंत्रणेला सोपे जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.आॅक्टोबरमध्ये अहवाल सादर करावा लागणार आहे.