‘स्वाभिमानी’च्या बेमुदत उपोषणास सुरुवात
By admin | Published: July 14, 2017 12:50 AM2017-07-14T00:50:03+5:302017-07-14T00:50:03+5:30
विनाटोकन तूर मोजणाऱ्यांवर कारवाईची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : तूर खरेदीच्या काळात विनाटोकन तूर मोजमाप होत असल्याचा प्रकार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला होता. दरम्यान, चिखली सहकारी संस्था सहायक निबंधक यांनी याबाबत कारवाई न करता चुकीचा निर्णय दिल्याची तक्रार जिल्हा उप निबंधकाकडे करूनसुद्धा महिनाभराचा कालावधी उलटूनही कारवाई न झाल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी १३ जुलैपासून चिखली तहसीलसमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चिखली नाफेड केंद्रावर २०० पोते तूर विनाटोकन मोजमाप होत असल्याचा प्रकार दोन महिन्यांपूर्वी उघड केला होता. तर सर्व घटनेचा सहायक निबंधक रूद्राक्ष यांनी पंचनामादेखील केला होता. परंतु यावर सहायक निबंधकांनी दोषींवर कारवाई न करता बनावट मालकास जप्त पोते देण्याचा निर्णय दिला असल्याचा आरोप करीत विनाटोकन तूर मोजल्याप्रकरणी चुकीचा निर्णय देणाऱ्या सहायक निबंधक यांच्यासह बनावट मालक, मूळ मालक व इतर दोषींवर कारवाई करावी, या प्रमुख मागणींसह तुरीचे चुकारे तत्काळ द्यावेत, नोंद झालेली तूर खरेदी करावी, दुबार पेरणीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, सुकाणू समितीच्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी, करपलेल्या पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्यात यावी आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नितीन राजपूत, विनायक सरनाईक, दीपक सुरडकर, विलास तायडे, अनिल चव्हाण, अशोक सुरडकर, राम अंभोरे, भरत जोगदंडे यांनी तहसिलसमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे.