लेखी आश्वासनाने शेतकऱ्यांचे उपाेषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:36 AM2021-07-27T04:36:25+5:302021-07-27T04:36:25+5:30
मेहकर: येथील शेतकऱ्यांचे कोराडी कॅनॉलच्या पाण्यामुळे गेल्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .संबंधित विभागाकडे वेळोवेळी ...
मेहकर: येथील शेतकऱ्यांचे कोराडी कॅनॉलच्या पाण्यामुळे गेल्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे .संबंधित विभागाकडे वेळोवेळी नियमानुसार लेखी विनंती करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे अखेर त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी २६ जुलैपासून मेहकर येथील पाटबंधारे विभागासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी येत्या दोन दिवसात शेतामध्ये येऊन वस्तुस्थिती पाहतो व योग्य ती कारवाई करतो असे लेखी आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या तरी आपले उपोषण मागे घेतले आहे.
कोराडी कॅनॉलच्या पाण्यामुळे मेहकर येथील जनार्दन नामदेव इंगळे, मधूकर भिकाजी इंगळे, विनोद दामोदर इंगळे ,रामेश्वर आश्रुजी इंगळे व .तर शेतकऱ्यांचे कोराडीच्या मायनर क्रमांक २ च्या कॅनॉलच्या पाण्यामुळे गेल्या दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. काही शेतकऱ्यांनी हा कॅनल फोडून कॅनलमध्ये पाणी सोडले आहे. कॅनलचे पाणी सुद्धा अडवले आहे. त्यामुळे या कॅनॉलचे पाणी वरील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जात आहे. त्यामुळे पिकांचे गेल्या दोन वर्षापासून अतोनात नुकसान होत आहे. मागील वर्षी सुद्धा असे नुकसान झाले होते. त्यावेळी सुद्धा संबंधित शेतकऱ्यांनी कोराडीच्या संबंधित अधिकाऱ्याकडे निवेदन दिले होते. मात्र या अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे मागील वर्षी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .तर यावर्षी सुद्धा नुकसान होणार की काय अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी दखल घेत नसल्याने शासनापुढे आपली बाजू मांडण्यासाठी जनार्दन नामदेव इंगळे व .तर शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग कार्यालयासमोर २६ जुलैपासून आमरण उपोषण सुरू केले होते. यासंदर्भात २८ जुलै रोजी स्थळ पाहणी करण्यासाठी कोराडी प्रकल्प पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता येणार असल्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने शेतकऱ्यांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.