लाभार्थ्यांना मोफत धान्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:15 AM2021-05-04T04:15:35+5:302021-05-04T04:15:35+5:30
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १ मे पर्यंत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे केवळ सकाळी ७ ते ...
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात १ मे पर्यंत कडक संचारबंदी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे केवळ सकाळी ७ ते ११ पर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना परवानगी देण्यात आलेली आहे. तर इतर सर्व बाजारपेठ व व्यवहार ठप्प आहेत. या काळात मजूर, कामगारांसह गरीब लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पात्र लाभार्थ्यांना रेशनचे मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय होऊन पंधरा दिवसांचा कालावधी होत आहे. तसेच संचारबंदी संपण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. तरीही अद्याप रेशनचे मोफत धान्य मिळाले नसल्याने लाभार्थी अडचणीत आहेत. संचारबंदीमुळे हातचे कामही गेले आणि मोफत धान्य ही मिळाले नसल्याने गोरगरीब जनतेसमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हे मोफतचे धान्य अद्याप पर्यंत शासकीय धान्य गोदाम मध्येच पोहोचले नसल्याने 15 मे पर्यंत असलेली संचारबंदी उठे पर्यंत तरी लाभार्थ्यांना माल मिळेल की नाही? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
लॉकडाऊन आणि संचारबंदी मुळे रोजगार नाही. शासनाने मोफत धान्य देण्याची घोषणा केलेली असली तरी जवळपास एक महिना होत आला तरी अद्याप मोफतचे रेशन मिळालेले नाही.
गोपाल व्यवहारे, मजुर
संचारबंदीच्या निर्णयामुळे सर्वच व्यवहार ठप्प आहेत. मजुरीचे काम ही लागत नसल्याने संसाराचा गाडा कसा हाकायचा असा प्रश्न गोरगरीब व रोजमजुरी करणाऱ्या जनतेसमोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे घोषणे प्रमाणे शासनाने रेशनचे मोफत धान्य त्वरित उपलब्ध करून द्यावे.
विजय केदारे, सामाजिक कार्यकर्ता.
४८ हजार रेशनकार्ड धारकांचे मोफत धान्याकडे लक्ष
मेहकर तालुक्यात एकूण ४८ हजार २५५ रेशन कार्ड धारकांची संख्या आहे. त्यामध्ये अन्न सुरक्षेचे ३३ हजार २०७, अंत्योदयचे ५ हजार ३०६ आणि शेतकरी ९ हजार ७४२ आहेत. सर्व रेशनकार्ड धारकांचे मोफत धान्य वितरणाकडे लक्ष लागलेले आहे.