कोरोना लसीकरणाच्या बॅनरवरून मुख्यमंत्र्यांच्या फोटोला बगल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:30 AM2021-01-17T04:30:12+5:302021-01-17T04:30:12+5:30
देशभरात कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. चिखली ग्रामीण रुग्णालयातही या लसीकरणाचा प्रारंभ स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आला. मात्र, ...
देशभरात कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. चिखली ग्रामीण रुग्णालयातही या लसीकरणाचा प्रारंभ स्थानिक लोकप्रतिनिधींच्या हस्ते करण्यात आला. मात्र, यानुषंगाने ग्रामीण रुग्णालयात लावण्यात आलेल्या प्रारंभाच्या बॅनरवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा फोटो टाकण्यात आलेला नव्हता. ज्या महाराष्ट्रात ही लस तयार झाली, त्याच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा फोटो नसल्याची बाब शिवसैनिकांना कळताच शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत स्थानिक ग्रामीण रुग्णालयात धडक दिली. लसीकरणाच्या प्रारंभासाठी ग्रामीण रुग्णालयात उपस्थित जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नितीन तडस, आर.एम.ओ. जी. आर. मकानदार, डॉ.घोलप, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इम्रान खान आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.खान यांना संतप्तपणे रस्त्यावर घेराव घातला. त्यानंतर या प्रकरणाचा तीव्र रोष व्यक्त करीत याप्रकरणी जाब विचारला. ही बाब गंभीर असल्याचे स्पष्ट करीत पुन्हा अशी चूक झाल्यास गंभीर परिणामाला सामोरे जाण्यास तयार राहण्याचा इशारा यावेळी तालुकाप्रमुख कपिल खेडेकर यांनी दिला. शिवसैनिकांद्वारे ग्रामीण रुग्णालयात लावण्यात आलेला प्रारंभाचा बॅनरदेखील हटविण्यात आला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, शहरप्रमुख श्रीराम झोरे, युवसेना तालुकाप्रमुख नंदू कऱ्हाडे, प्रीतम गैची, रवी पेटकर, बंटी गैची, दीपक सोनवाल, बंटी चोपडा आदी पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांची उपस्थिती होती.