जिल्हा परिषद शाळेवर ‘भाडोत्री’ शिक्षक

By admin | Published: January 7, 2015 12:23 AM2015-01-07T00:23:33+5:302015-01-07T00:23:33+5:30

लोकमत स्टिंग ऑपरेशन ; बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार.

'Bhadotri' teacher at Zilla Parishad School | जिल्हा परिषद शाळेवर ‘भाडोत्री’ शिक्षक

जिल्हा परिषद शाळेवर ‘भाडोत्री’ शिक्षक

Next

बुलडाणा : बुलडाणा शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या देऊळघाट येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेवर दोन भाडोत्री शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत असल्याचे धक्कादायक वास्तव लोकमतच्या ह्यस्टिंग आपॅरेशनह्ण ने समोर आणले आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा सावळा गोंधळही यानिमित्ताने उघड झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांवर प्रशासनाचा कोणताही अंकूश नसल्याच्या अनेक तक्रारी असून, या तक्रारींची दखल गांभिर्याने घेतली जात नाही. त्यामुळेच शाळांमधील गोंधळ दिवसेंदिवस वाढत असून, आता चक्क भाडोत्री शिक्षक नेमण्यापर्यंत व्यवस्थापनाची मजल गेली असल्याचे या स्टिंग ऑपरेशनने स्पष्ट केले आहे.
नबाबनगरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या देऊळघाट येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जवळपास एक हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत असून, सध्या शाळेचे मुख्याध्यापक पद प्रभारी आहे. येथील एक शिक्षिका प्रसुती रजेवर गेली आहे. या शाळेमध्ये लोकमतने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान धक्कादायक बाबी समोर आल्या.
सामाजिक शास्त्र व कला हे दोन विषय शिकविण्यासाठी मढ येथून एक शिक्षक शाळेत येत असतो. त्याची या शाळेवर अधिकृत नियुक्ती केलेली नाही, हे विशेष. प्रसुती रजेवर गेलेल्या शिक्षिकेच्या जागेवर आणखी एका विज्ञान पदवीधराची नियुक्ती अशाच पद्धतीने करण्यात आली आहे.
लोकमत चमूने या शाळेला भेट दिली असता, सदर शिक्षक इयत्ता दहावी (अ) च्या वर्गावर शिकवताना आढळला. लोकमत चमूने कॅमेरा बाहेर काढताच या शिक्षकाने वर्गाबाहेर पडण्याची तयारी केली; लोकमत चमूने त्यांना थांबण्याची विनंती केल्यानंतर तो काही क्षण थांबला; मात्र नंतर लगेच तो वर्गाबाहेर गेला. या शिक्षकाचे नाव काय, शिक्षण किती, तो कधीपासून शाळेवर काम करीत आहे, आदी प्रश्नांवर शाळेवरील एकाही शिक्षकाने दिली नाही. दूसरा शिक्षक आज हजर नव्हते; मात्र तेसुद्धा खास विज्ञान विषय शिकविण्यासाठी आयात केल्याची माहिती सुत्रांनी दिली. या शिक्षकाबाबत शाळा व्यवस्थापन समितीकडे विचारणा केली असता कुणीही उपलब्ध होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)

*सहीसाठी वेगळे मस्टर
देऊळघाट जिल्हा परिषद शाळेवर भाडोत्री शिक्षकांसाठी सही करण्याकरीता वेगळे मस्टर तयार करण्यात आले असून त्याची नोंद मुख्याध्यापक स्वत: ठेवतात अशी माहिती मिळाली.

*शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव
एखादी शिक्षिका मातृत्व रजेवर गेली असेल किंवा एखादा शिक्षक दीर्घ रजेवर गेला असेल, तर त्याच्या जागेवर स्वयंप्रेरणेने शिकविणारा कोणताही शिक्षक नेमण्याचा नियम नाही. शालेय व्यवस्थापन समितीने तसा ठराव घेऊन, एखाद्या शिक्षकाची नेमणूक केली तरी त्याला जिल्हा परिषद प्रशासनाची मान्यता हवी असते. या ठरावाबाबत जिल्हा परिषद प्रशासनाशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात आला नाही, तसेच जिल्हा परिषद प्रशासनाची मान्यताही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे मातृत्व रजेवर असलेल्या शिक्षिकेच्या जागी नेमण्यात आलेला शिक्षक हा भाडोत्रीच असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांसाठी सदर शिक्षक हा अपंग समावेशीत शिक्षक म्हणून वाशिम येथील आसरा माता शिक्षण संस्थेकडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. दूसरा शिक्षक हा स्वयंप्रेरणेतून शिक्षणाचे काम करीत आहे. ते यापूर्वी अंशकालीन शिक्षक म्हणूनही कार्यरत होते, असे प्रभारी मुख्याध्यापक, डी.डी.वायाळ यांनी स्पष्टीकरण दिले. तर शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी अपंग समावेशीत शिक्षक म्हणून सध्या कुणीच कार्यरत नसल्याचे सांगीतले. स्वयंप्रेरणोतून कुणी काम करत असेल, तर त्याबाबत नियम तपासून पाहावे लागतील. कुठेही भाडोत्री शिक्षक नेमला जात असेल किंवा नियमबाह्य काम होत असतील, तर चौकशी करून संबधितांवर कारवाई केली जाईल, असे त्या म्हणाल्या.
२00९-१0 मध्ये अपंग समावेशित शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती; मात्र ती रद्द करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातून अशाप्रकारे कोणत्याही शिक्षकाला बुलडाण्यात पाठविल्याची माहिती नाही. संस्थांनीसुद्धा तशी कोणतीही माहिती शिक्षणाधिकार्‍यांना दिलेली नसल्याचे सर्वशिक्षा अभियानाचे समन्वयक नितेश गवई यांनी स्पष्ट केले.

Web Title: 'Bhadotri' teacher at Zilla Parishad School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.