चार दशके गुणवान खेळाडू घडविणारे ‘भगत गुरूजी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 11:35 AM2020-08-29T11:35:58+5:302020-08-29T11:36:42+5:30
बुलडाण्याच्या जिल्हा परिषद हायस्कूलचे नाव त्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने थेट राज्यस्तरावर नेले
बुलडाणा: राज्यात क्रीडा क्षेत्रात बुलडाण्याचे नाव उंचावण्यामध्ये तब्बल चार दशके महत्त्वाचे योगदान बुलडाणा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधून सेवानिवृत्त झालेले जे. बी. भगत यांनी दिले आहे.
बुलडाण्याच्या जिल्हा परिषद हायस्कूलचे नाव त्यांनी आपल्या कार्यकर्तुत्वाने थेट राज्यस्तरावर नेले. ऐवढेच नव्हे तर पोलिस दलाचा १९९० च्या दशकातील कबड्डीचा संघ घडविण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगादन राहले. या संघाची बांधणी पूर्ण झाल्यानंतर आॅल इंडिया टुर्नामेंटमध्ये बुलडाण्याच्या पोलिस संघाने नंतर कधी मागे वळून पाहले नाही. पोलिस, महावितरण, राज्य परिवहन महामंडळातील अनेक गुणवान खेळाडू त्यांनी घडविले आहे. बुलडाण्याचे कुस्तीपटू तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त टी.ए. सोर यांना घडविण्यामध्येही त्यांची महत्त्वाची भूमिका होती. १९६० ते २००० दरम्यान क्रीडा क्षेत्रात त्यांच्या मार्गदर्शनामुळे शालेय तथा पोलिस विभागाच्या स्पर्धांमध्ये बुलडाण्याचा दबदबा राहला आहे. अॅथलेटीक्समध्येही बुलडाण्याला राज्यस्तरावर पहिले सुवर्ण पदक त्यांनी घडविलेल्या संजय चिटवारच्या रुपाने मिळाले. त्यानंतर १९८० दशकापासून अॅथलेटीक्स, टेबल टेनीस, कुस्ती, थ्रो बॉल, लंगर छाप उडी (ट्रीपल जंप), बॅडमिंटन खेळामध्ये त्यांनी बुलडाण्याला गुणवान खेळाडू मिळवून दिले.
शिस्तप्रिय भगत गुरूजी खेळाडूची बारकाईने पाहणी करून त्याी देहबोली, खेळतानाचे त्याचे पदलालित्य बघूनच त्याच्यातील गुणवत्ता ओळखत. क्रीडा दिनानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी जुन्या गोष्टींचा उजाळा दिला. खेळामध्ये आता पुर्वीचे अॅम्युचर (हौशीपणा) हरवला. पूर्वी सुविधांची कमतरता होती. मात्र आता शारीरिक मेहनतीकडे दुर्लक्ष होत आहे. सोबतच शाळेतील शेवटचा क्लास हा खेळासाठी दिला जावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. क्रीडा क्षेत्राची आवड असल्याने त्यांनी स्व: खर्चातून बंगळुरू येथे जावून एनआयएस केले.