Bhaiyyuji Maharaj suicide : पारध्यांची पोरं झाली पोरकी !
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2018 07:40 PM2018-06-12T19:40:43+5:302018-06-12T19:46:45+5:30
विज्ञानाला अध्यात्माची जोड देत समाजातील दुर्लक्षीत घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भय्यूजी महाराजांनी अविरत कार्य केले.
- योगेश फरपट
खामगाव : विज्ञानाला अध्यात्माची जोड देत समाजातील दुर्लक्षीत घटकाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भय्यूजी महाराजांनी अविरत कार्य केले. पारधी समाजातील मुला-मुलींना शिक्षणाचे द्वार खुले व्हावे यासाठी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील सजनपूरी भागात भय्यूजी महाराजांनी निवासी आश्रमशाळा सुरु केली. त्यांच्या अचानक जाण्याने आश्रमशाळेतील मुलांनाच नव्हेतर इथे काम करणा-या शिक्षक वर्गालाही धक्का बसला असून आमचा ‘पालनहार’ हरवला असल्याचे सांगत एका शिक्षकाला रडू कोसळले.
जिल्हयातीलच नव्हेतर महाराष्ट्रातील आदिवासी व पारधी समाजातील मुले, मुलींना शिक्षणाची निवासी सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने डॉ. प.पू. श्री. भय्यूजी महाराजांनी दहा वर्षापूर्वी खामगावातील सजनपूरी भागात ९ जून २००६ रोजी सुर्याेदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळा सुरु केली. या आश्रमशाळेला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. पारधी समाजाशिवाय आदीवासी प्रवर्गातील इतर मुलेही याठिकाणी शिक्षण घेत आहेत. दीडशे मुलांपासून सुरवात झालेल्या या आश्रमशाळेत सद्यस्थितीत ६१८ मुले-मुली निवासी शिक्षण घेत आहेत. शिक्षणासोबत अध्यात्माचे ज्ञान याठिकाणी मिळत होते. याशिवाय एक संस्कारक्षम युवक घडविण्यावर महाराजांनी भर दिला होता. आश्रमशाळेत शिकणा-या प्रत्येक विद्यार्थ्याचा शारिरिक, मानसिक व अध्यात्मिक विकास झालाच पाहिजे याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यासाठी ते दर महिन्याला एकदा मुलांची भेट घेत असत. आश्रमशाळेच्या बाजूलाच ‘ऋषीसंकूला’चे निर्माण केले. याठिकाणी मुलांना अध्यात्माचे शिक्षण याठिकाणी मिळते. संगीत, खेळ, कला, साहित्य, धर्म अशा विविध पातळीवरील शिक्षणाची सुविधा एकाच व्यासपिठावर मिळते. सुर्याेदय निवासी आश्रमशाळेतील अनेक मुले आज शासनाच्या विविध पदावर कार्यरत आहेत. याशिवाय पारधी समाजाच्या उत्थानासाठी झटत आहेत. महाराजांच्या अचानक निधनाची वार्ता कळताच आश्रमशाळेवर दुखा:चा डोंगरच कोसळला.
महाराजांना मुलांवर विशेष प्रेम होते. खामगाव आले की मुलांना भेटल्याशिवाय ते जात नव्हते. आश्रमशाळेच्या स्थापनेपासूनच महाराजांसोबत राहिलो. पारध्यांच्या मुलांविषयीची त्यांची तळमळ पाहून आम्हालाही अधिक काम करण्याचा हुरूप यायचा. त्यांच्या जाण्याने पारध्याची पोरं आता पोरकी झाली आहेत. त्यांचे काय होईल याचीच चिंता सतावत आहे. - गोवर्धन टिकार, शारिरिक शिक्षक, सुर्योदय पारधी समाज आदिवासी आश्रमशाळा, खामगाव.