Bharat Jodo Yatra: ‘ते’ देश तोडला जाण्याची वाट पाहत आहेत का? तुषार गांधी यांचा विराेधकांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 06:04 AM2022-11-19T06:04:34+5:302022-11-19T06:07:36+5:30

Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांनी भारत जाेडाे यात्रा सुरू केल्यावर विराेधकांनी देश तुटला आहे का? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. असा प्रश्न विचारणारे लोक देश तोडण्याची वाट पाहत आहेत का?

Bharat Jodo Yatra: Are 'they' countries waiting to be broken up? Tushar Gandhi's question to the opposition | Bharat Jodo Yatra: ‘ते’ देश तोडला जाण्याची वाट पाहत आहेत का? तुषार गांधी यांचा विराेधकांना सवाल

Bharat Jodo Yatra: ‘ते’ देश तोडला जाण्याची वाट पाहत आहेत का? तुषार गांधी यांचा विराेधकांना सवाल

googlenewsNext

शेगाव (जि. बुलढाणा) : राहुल गांधी यांनी भारत जाेडाे यात्रा सुरू केल्यावर विराेधकांनी देश तुटला आहे का? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. असा प्रश्न विचारणारे लोक देश तोडण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल उपस्थित करत  त्या नेत्याला देश तुटण्याची चाहूल लागताच तोच नेता देश जोडण्यासाठी बाहेर पडतो. तुटल्यानंतर जोडण्यासाठी धावाधाव करण्यात काय फायदा, अशा शब्दात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी राहुल गांधी यांच्या भारत जाेडाे यात्रेचे काैतुक केले.

ते म्हणाले, दांडी मार्चमध्ये महात्मा गांधी, मोतिलाल नेहरू, पंडित नेहरू सहभागी झाले होते. अशा यात्रा आम्ही इतिहासातच वाचल्या हाेत्या; पण आज अनुभवता आली.  आज मी भारत जाेडाे पदयात्रेत चाललो, या माध्यमातून राहुल गांधी हे सामान्य जनता, गरीब, पीडित लोकांचे दुःख समजून घेत आहेत हे प्रकर्षाने जाणवले

डराे मत, तोडणारे राहत नाहीत : पटाेले 
भारत जाेडाे यात्रेतून राहुल गांधी यांनी ‘डरो मत’ अशी हिम्मत दिली, आम्ही जाेडण्यासाठी निघालाे आहाेत, हा विश्वास दिला. ते देश, संविधान व लाेकशाही वाचविण्याची भाषा करतात तर दुसरीकडे भाजप देश ताेडण्याची, द्वेष पसरविण्याचे काम करते, असा आराेप करत जे जाेडण्यासाठी निघतात तेच कायम राहतात, ताेडणारे राहत नाही, असा आशावाद काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांनी व्यक्त केला.

ही तर उत्स्फूर्त सभा : थाेरात
स्वातंत्र्यांचा अमृत महाेत्सव साजरा करत असताना लोकशाही व संविधान धाेक्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे भारत जाेडाे यात्रेतून लाेकांना विश्वास देण्याचे काम सुरू आहे. राहुल गांधी हे प्रेम, जिव्हाळा, आपुलकी देत निघाले आहेत. त्यामुळे आज जमलेली सभा ही उत्स्फूर्त सभा आहे. एवढी प्रचंड सभा कधी झाली नाही. ही सभा अविस्मरणीय आहे, असे विधिमंडळ काँग्रेस नेते व भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्र समन्वयक बाळासाहेब थोरात म्हणाले. 

ही विमानाची यात्रा नाही : अशोक चव्हाण
महाराष्ट्रातून एक यात्रा विमानाने गुजरातमार्गे गुवाहाटीत गेली अन् त्या गुवाहाटीत काय डाेंगर, काय हाटील, काय झाडी, सर्व ओक्के आहे, असे समाेर आले; पण महाराष्ट्रात काहीच ओक्के नाही, असा आराेप करत भारत जाेडाे यात्रा व आजची सभा महाराष्ट्र व देशातील बदलणाऱ्या परिवर्तनाचे संकेत आहेत. ही विमानाची यात्रा नाही, असा टाेला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हाणला. यात्रा सुरू झाल्यावर बेरोजगारीच्या प्रश्नाला राहुल गांधी यांनी वाचा फोडताच भाजप सरकार काही हजार नोकऱ्यांची नियुक्तीपत्र वाटत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

निराश हाेऊ नका : कन्हैयाकुमार
अच्छे दिनचे स्वप्न दाखवून तरुणांना भुलवले जात आहे. आपले भविष्य धाेक्यात आहे, अशी भीती निर्माण झाली आहे.अशा वेळी आमचे नेते राहुल गांधी म्हणतात ‘डराे मत’, निराश हाेऊ नका, आपण सर्वांनी मिळून लढू या, हा आशावाद ते देतात. त्यांचे हेच शब्द येणाऱ्या काळात इतिहास घडवतील, असे काॅंग्रेसचे युवा नेते कन्हैयाकुमार यांनी सांगितले.

संत विचारांनी ताकद दिली : ठाकूर
महाराष्ट्राला संत विचारांचा वारसा आहे, संतांनी प्रेम, आदर शिकवले, याच संत विचारातून अन्यायविराेधात बंड पुकारण्याची ताकद मिळाली आहे. ताेच वारसा घेऊन राहुल गांधी यांची भारत जाेडाे यात्रा निघाली आहे. या यात्रेतून शांती, प्रेम अन् बंधुभावाचा जागर हाेत आहे. त्यामुळे ही यात्रा लाेकांची यात्रा झाली असून त्याचे प्रत्यंतर आजच्या सभेत आले आहे,असा विश्वास माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला. 

समरसतेशिवाय विकास नाही : मुख्यमंत्री बघेल
स्वातंत्र्यलढ्यात टिळक यांनी इंग्रजांच्या विराेधात हिंदू- मुस्लिमांची एकजूट अपेक्षित केली हाेती, तीच परंपरा त्यांचे उत्तराधिकारी महात्मा गांधी यांनी पुढे नेली. या देशाचा विकास हा समरसतेमध्ये आहे. त्यामुळे प्रेम, संवाद या माध्यमातून समरसतेचा विचार राहुल गांधी पुढे नेत आहेत, असे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले.

...तेव्हाही तिरंगा फडकवला : वासनिक 
 भाजपच्या सत्ताकाळात संसद, न्यायपालिका, संविधान धाेक्यात आले आहे. तिरंग्यावर संकट आणले आहे. अन् आता घर घर तिरंगा ही माेहीम हाती घेऊन नाटकी देशप्रेम दाखविण्याचा प्रयत्न केला जाताेय, अशी टीका करत जेव्हा तिरंगा फडकविणे गुन्हा हाेता तेव्हाही काॅंग्रेसने तिरंगा फडवला हाेता, अशी आठवण अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी करून दिली. भारत जाेडाे यात्रेच्या समाराेपाला श्रीनगरमध्ये तिरंगा फडकेल त्याच दिवशी देश ताेडणाऱ्याचा ऱ्हास सुरू हाेईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: Bharat Jodo Yatra: Are 'they' countries waiting to be broken up? Tushar Gandhi's question to the opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.