आदिवासी महिलांसोबत साजरी केली भाऊबीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:49 PM2017-10-22T23:49:39+5:302017-10-22T23:49:56+5:30
जळगाव जामोद : एकविसाव्या शतकाच्या वाटचालीनंतर सुध्दा समाजातील अनेक घटक मुख्य प्रवाहापासून व प्रकाशपर्वापासून दूर आहेत. अशा वंचितांची दिवाळी सारख्या महत्वाच्या सणाला आठवण करुन त्यांच्या वस्त्या व पाड्यांवर जावून दिवाळी-भाऊबिज सारखे सण जेव्हा समाज मान्यता असलेल्या व्यक्ती साजरे करतात तेव्हा वेगळा आदर्श निर्माण होत असतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : एकविसाव्या शतकाच्या वाटचालीनंतर सुध्दा समाजातील अनेक घटक मुख्य प्रवाहापासून व प्रकाशपर्वापासून दूर आहेत. अशा वंचितांची दिवाळी सारख्या महत्वाच्या सणाला आठवण करुन त्यांच्या वस्त्या व पाड्यांवर जावून दिवाळी-भाऊबिज सारखे सण जेव्हा समाज मान्यता असलेल्या व्यक्ती साजरे करतात तेव्हा वेगळा आदर्श निर्माण होत असतो.
माजी राज्यमंत्री सुबोध सावजी हे असेच एक आगळे व्यक्तीमत्व. गत अकरा वर्षापासून दुर्गम भागात राहणार्या आदिवासी महिलांमध्ये जावून हा ‘भाऊ’ भाऊबीज साजरी करतो आणि ओवाळणी म्हणून त्यांना जीवनोपयोगी एखादी वस्तू भेट देतो.
शनिवारी भाऊबिजेच्या दिवशी सुबोध सावजी यांनी जळगाव जामोद तालुक्यातील विकासापासून कोसोदूर असलेल्या चाळीसटापरी, मोठे गोमाल व छोटे गोमाल या आदिवासी गावात जावून भाऊबीज साजरी केली. या गावातील सर्व महिलांनी सुबोध सावजी व त्यांच्या समवेत असणार्या सर्व प्रतिष्ठितांना परंपरागत पध्दतीने ओवाळले. यावेळी आदिवासी महिलांच्या चेहर्यावर हास्य फुलले मनात आनंदाची लहर निर्माण झाली. आणि कोणीतरी दिग्गज भाऊ आपल्या पाठीशी उभा आहे. या भावनेतून जगण्याची हिम्मतही वाढली.
सुबोध सावजी यांनी यापूर्वी सायखेड, भिंगारा, जनुना या आदिवासी गावांमध्ये रक्षाबंधन व भाऊबीज साजरी केली आहे. तर अ.भा.काँग्रेस कमिटीचे चिटणीस आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी चाळीस टापरी व गोमाल या आदिवासी गावात १७ वर्षापासून संपर्क ठेवत वैद्यकीय मदत, अन्नदान व दिवाळी भेट दिली आहे. त्याचीही प्रशंसा हे आदिवासी बांधव मुक्तकंठाने करतात.
ओवाळणीत दिली ब्लँंकेटची भेट
चाळीस टापरी व दोन्ही गोमाल येथील सर्व आदिवासी भगिनींना सुबोध सावजी यांनी उलनच्या ब्लॅकेंटची भेट दिली. सुमारे पावणे दोनशे कुटूंबातील भगिनींना या जीवनाश्यक वस्तूची भेट मिळाल्याने या भगिनींसह त्यांच्या कुटुंबीयांच्याही चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. याशिवाय या गावाच्या काही गरजा भागविण्यासाठी सहकार्य करण्याचे अभिवचनही सुबोध सावजी यांनी यावेळी दिले. या नावीण्यपूर्ण भाऊबीजप्रसंगी वा.रा.पिसे, अर्जुन घोलप, अबरार खान मिल्ली, अरुण ताडे, माया धाडे, चंद्रकांत माने, पांडूरंग ताडे, गणेश उमरकर, शमीम देशमुख आदींची उपस्थिती होती.