भेंडवळची घटमांडणी १० मे रोजी होणार; घटमांडणीला तीनशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा

By विवेक चांदुरकर | Published: April 30, 2024 07:29 PM2024-04-30T19:29:13+5:302024-04-30T19:29:35+5:30

यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे

Bhendval will be constituted on 10th May; Constitution has a tradition of more than three hundred years | भेंडवळची घटमांडणी १० मे रोजी होणार; घटमांडणीला तीनशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा

भेंडवळची घटमांडणी १० मे रोजी होणार; घटमांडणीला तीनशेपेक्षा जास्त वर्षांची परंपरा

विवेक चांदूरकर-जयदेव वानखडे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव-जामोद (खामगाव जि. बुलढाणा): पीक परिस्थिती, पाऊसपाणी त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची घटमांडणी यावर्षी १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे. यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे.

पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वीतलावर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकिताकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. या घटमांडणीचे भाकीत ११ मे रोजी वर्तविले जाणार आहे.

पाणी पाऊस, पीक परिस्थिती, राजकीय स्थिती तसेच आर्थिक संकटे याबाबत ठोकताळे या घटमांडणीतून वर्तविले जातात. त्यामुळे सामान्य जनतेतही आणि राजकीय लोकांनाही या मांडणीची प्रचंड उत्सुकता असते. जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची ही परंपरा तीनशे वर्षापासून सुरू आहे. भेंडवळची घटमांडणी १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल. मांडणीचे भाकीत ११ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज जाहीर करणार आहेत.

घटमांडणी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. शेतकरी मोठ्या उत्साहाने या घटमांडणीचे भाकीत ऐकण्यासाठी उपस्थित असतात. घटांमध्ये झालेल्या बदलानुसार भाकिते वर्तविण्यात येतात.

अशी केली जाते घटमांडणी

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर बस स्टॅन्ड शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी इत्यादी अठरा प्रकारची धान्य ठेवण्यात येतात. घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात. पानसुपारी, पुरी, पापड, सांडोळी- कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे या घटांमध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण केले जाते. त्यानंतर भाकीत वर्तविण्यात येते.

Web Title: Bhendval will be constituted on 10th May; Constitution has a tradition of more than three hundred years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.