भेंडवळचं भाकीत शेतकऱ्यांची दिशाभूल अन् फसवणूक करणारा प्रकार - अंनिस
By सदानंद सिरसाट | Published: May 11, 2024 09:56 AM2024-05-11T09:56:41+5:302024-05-11T09:56:52+5:30
बुलडाणा जिल्ह्यातून दरवर्षी जाहीर होणाऱ्या भेंडवळच्या घटमांडणीची पंरपरा आहे. ही घटमांडणी सुमारे ३७० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे.
खामगाव (बुलढाणा) - बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवडची घटमांडणी शेतकऱ्यांची निव्वळ दिशाभूल व फसवणूक करणारा प्रयोग आहे. लीळावती विद्येचा दावा खोटा असून ही विद्या सिद्ध करणाऱ्यास अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून २५ लाख रुपये व २५ लाख रुपये वैयक्तिक असं ५० लाखांचे बक्षीस अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलकर यांनी जाहीर केले आहे.
बुलडाणा जिल्ह्यातून दरवर्षी जाहीर होणाऱ्या भेंडवळच्या घटमांडणीची पंरपरा आहे. ही घटमांडणी सुमारे ३७० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर बुलडाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ गावात होणारी घटमांडणी विदर्भातीलच नव्हे तर राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्यासाठी पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तवते.
शेतकऱ्यांचा भेंडवळ घटमांडणीवर विश्वास आहे. दरवर्षी या मांडणीचे भाकित ऐकण्यासाठी हजारो शेतकरी उपस्थित असतात. घटमांडणीचे भाकित घेऊन शेतकरी पुढील हंगामाची पेरणी काय करायची, ते ठरवत असतात. पावसाची महिनावार माहिती आणि पीक परिस्थितीचा अंदाजही वर्तवण्यात येतो. अंधश्रद्धा निर्मूलन समिती याला निव्वळ ठोकताळे म्हणत आहे.
आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक रघुनाथ कौलकर यांनी या घटमांडणीवर आरोप करत त्याला थोतांड म्हटलं आहे. मांडणीच्या माध्यमातून जाहीर केलेली भाकिते अनेकवेळा खोटी ठरलेली आहेत. या घटमांडणीच्या आहारी जाऊ नये, असं, आवाहनही कौलकर यांनी केलं आहे.