भिंगारा, चाळीसटापरी, गोमाल या गावांचा मतदानावर बहिष्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 06:34 PM2019-04-18T18:34:13+5:302019-04-18T18:34:58+5:30
जळगाव जामोद : स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या ७२ वर्षात रस्ता, आरोग्य, शिक्षण, उर्जा आदी भौतीक सुविधा प्राप्त न झाल्याने जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी ग्राम भिंगारा, चाळीसटापरी व गोमाल या गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला.
- नानासाहेब कांडलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या ७२ वर्षात रस्ता, आरोग्य, शिक्षण, उर्जा आदी भौतीक सुविधा प्राप्त न झाल्याने जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी ग्राम भिंगारा, चाळीसटापरी व गोमाल या गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. या गावातील एकाही मतदाराने मतदान केले नाही. एक महिन्यापुर्वी म्हणजे १९ मार्च रोजी या गावातील सरपंच व नागरीकांनी उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर यांना विविध समस्यसांबाबत निवेदन देवून मतदानावर बहिष्काराबाबत सुतोवाच केले होते.
भिंगारा व गोमाळ येथे लाखो रूपयाचा निधी खर्च करून इंधनावर चालणारा उर्जा प्रकल्प शासकीय निधीतून उभारण्यात आला. परंतु या प्रकल्पातून एक युनिटही उर्जा बाहेर आली नाही. परिणामी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तीन खुटी ते भिंगारा या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचा निधी खर्च झाला. परंतु रस्ता बनलाच नाही. याचीही चौकशी व्हावी आणि तीन खेटी ते भिंगारा ते चाळीसटापरी ते गोमाल असा रस्ता तयार व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांची आहे. चाळीसटापरी व गोमाल येथे पिण्याचे पाण्याची भीषण टंचाई असून प्रशासनाने त्यावर उपाययोजना करावी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीवर लाखोचा खर्च झाला. परंतु तेथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने ती इमारत शोभेची वस्तु बनली आहे. नियमीत वैद्यकीय अधिकारी देण्यात यावा, ही सुध्दा ग्रामस्थांची मागणी आहे.
शेत जमिनीचे पट्टे नियमाप्रमाणे आदिवासी बांधवांना वितरीत करावे. शाळा इमारतीच्या बांधकामात झालेला भ्रष्टाचार शोधून दोषींवर कारवाई करावी. या मागण्यांचा सुध्दा समावेश आहे. म्हणजेच आरोग्य, पाणी, रस्ता, शिक्षण, वीज व शेतजमीन पट्टे या मुख्य मागण्यांसाठी भिंगारा, चाळीसटापरी व गोपाल या तीन गावातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार टाकला. आणि तो एकजुट कायम राखीत यशस्वी करून दाखविला.
गत दोन निवडणुकीत ७० टक्के मतदान!
सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत भिंगारा मतदान केंद्रावर ६२.७८ टक्के मतदान झाले होते. तर सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ७०.७८ टक्के मतदान करून या गावातील मतदारांनी मतदान प्रक्रियेत मोठा सहभाग नोंदविला होता. यावेळी भिंगारा (मतदान केंद्र क्रमांक ३) या मतदान केंद्रावर एकुण ११७६ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. परंतु यापैकी एकाही मतदाराने मतदान केले नाही. गोमाल गावाचे मतदान केंद्र क्र. ४ वर (कुंवरदेव) येथे आहे. परंतु या गावातील मतदारांनी सुध्दा मतदान केले नाही. आपली एकजुट कायम ठेवली. या बहिष्कारानंतर तरी या गावांकडे प्रशासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे. विशेष म्हणजे भिंगारा व चाळीसटापरी या गट ग्रामपंचायतीमध्ये रूख्माबाई सुरेश मुझाब्दा या महिला सरपंच आहेत.
पुढाºयांना गावबंदी!
मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतरही सदर ग्रामस्थांच्या समस्या ऐकुन सोडविण्याच्या दिशेने कोणतेच प्रयत्न होत नसल्याचे पाहून त्यांनी याविषयी आक्रमक पवित्रा घेत १३ एप्रिलपासून पुढाºयांना गावबंदी केली होती. या बंदीचा फलक गावाच्या प्रवेशव्दारावरच लावण्यात आला होता.