भोसा ग्रामपंचायतने केली विद्युत चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:35 AM2021-05-19T04:35:53+5:302021-05-19T04:35:53+5:30
मेहकर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या भोसा या गावात ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, मेहकर ...
मेहकर तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या भोसा या गावात ग्रामपंचायतच्या नियोजनशून्य कारभारामुळे भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, मेहकर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आशिष पवार यांनी विस्तार अधिकारी सोनुने व पंडागळे या दोघांची चौकशी समिती नेमून २६ एप्रिल रोजी भोसा या गावात चौकशीसाठी पाठविले होते. भोसा येथे लाखो रुपये खर्च करून लोकांना शुद्ध व थंड पाणी पिण्यास मिळावे म्हणून गेल्या दहा महिन्यांपासून वॉटर फिल्टर (आरो) उभा करण्यात आला असून, हा प्लांट शोभेची वस्तू बनली आहे. यासंदर्भात अधिकारी चौकशी करणार असल्याने चक्क ग्रामपंचायतच्या सरपंच, सचिवांनी अवैध विद्युत कनेक्शन जोडून चौकशी समितीला वॉटर प्लांट सुरू असल्याचे दाखविले; मात्र प्रत्यक्षात वॉटर फिल्टरचे एटीएममध्ये बिघाड असल्याने आरो बंद आहे, अशी सारवासारव ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात आली. चौकशी समितीने ग्रामस्थांना याविषयी विचारणा केली असता, हे पाणी कायमचेच बंद असल्याचे सांगण्यात आले; परंतु या प्लांटकरिता विद्युत जोडणीसाठी साधा अर्जही महावितरण कंपनीकडे नसल्याने हे अवैध असलेले कनेक्शन एमएसइबीचे जेई बुळे यांनी कापल्याने भोसा ग्रामपंचायतने फिल्टरसाठी वीज चोरी केल्याचे उघड झाले.
फसवणुकीमुळे कारणे दाखवा नोटीस
गट विकास अधिकारी आशिष पवार यांच्याशी संपर्क केला असता, वॉटर फिल्टरला विद्युत कनेक्शन नसताना वॉटर फिल्टर सुरू असल्याचे चौकशी समितीने अहवालात दाखविले असून, ही फसवणूक झाली आहे. यावर गट विकास अधिकारी आशिष पवार यांनी तत्काळ चौकशी समितीला व भोसा ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांना प्रशासनाच्या झालेल्या फसवणुकीबाबत कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करण्याचे सांगितले.
महावितरणही झाले अलर्ट
महावितरणचे अभियंता बुळे यांच्याशी संपर्क केला असता, भोसा ग्रामपंचायतने वॉटर फिल्टरसाठी आमच्या कार्यालयात विद्युत जोडणीबाबत आजपर्यंत अर्ज केलेला नाही व भोसा ग्रामपंचायतने जोडलेली वीज तत्काळ कापण्यात आली असून, त्यांना समज देण्यात आली आहे. या प्रकरणामुळे आता महावितरणही अलर्ट झाले आहे.