जग मोठे विचित्र - मुनीश्री विशेषसागरजी
By admin | Published: April 17, 2015 01:32 AM2015-04-17T01:32:22+5:302015-04-17T01:32:22+5:30
मलकापूर येथे प्रवचनमालेचा समारोप
मलकापूर (जि. बुलडाणा): दीपक विझवणे सर्वच जाणतात; परंतु दीपक पेटविणारे फार कमी. घर पाडण्याचे सर्वच जाणतात, परंतु घर बांधणारे फार कमी आहेत. थोडक्यात आजचे युग मोठे विचित्र, असे विचार श्रमणमुनिश्री विशेषसागरजी महाराज यांनी येथे व्यक्त केले. येथील पोरवाड भवनमध्ये आयोजित सम्यकदर्शनाच्या सहाव्या अंगाच्या स्थितीकरण अंगावर धर्मसभा समारोपप्रसंगी विशेषसागरजी महाराज यांनी बुधवारी प्रवचन केले. यावेळी ते म्हणाले की, व्यक्तीला पाडणारे बरेचसे आहेत, पण उचलणारे फार कमी आहेत. पडत्याला पाडणारे, मरत्याला मारणारे, तुटक्याला तोडणारे ठिकठिकाणी भेटतील; परंतु अशा नकारात्मक प्रवाहाविरुद्ध सकारात्मक दृष्टी बाळगून काम करणारे थोडेथोडकेच आढळतात, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. सम्यकदर्शन व सम्यक चरित्रला धरून श्रावकांनी स्वत:हून जेवढे शक्य होईल तेवढे धर्ममार्गाला स्थिर करणे यालाच स्थितीकरण अंग म्हणतात. लक्षात ठेवा, १00 मूर्तींंंच्या स्थापनेऐवजी एक चेतन मूर्ती म्हणजेच एका साधूला वाचविले पाहिजे. कारण चेतनमूर्ती राहिले, तर हजारो, लाखो अचेतन तीर्थ उभे करू शकतील. लक्षात ठेवा, आ पण मुनी बनू शकत नाही, साधना करू शकत नाही, परंतु जे साधक साधना करतात, त्यांच्या साधनेत बाधा तरी आणू नका. प.पू. आचार्य विरागसागरजी महाराज म्हणातात की, योगी होणे श्रेष्ठ आहे, पण आपण योगी बनू शकत नाही; भक्त जरूर बनू शकतो, असे मुनिश्रींनी मार्गदर्शन केले. समारोपीय धर्मसभेला भाविक व श्रद्धाळूंनी मोठय़ा संख्येने गर्दी केली होती.