राजूर घाटात ४०० ठिकाणी बिजारोपण; पर्यावरण संवर्धनासाठी बुलडाणा वकील संघ सरसावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 05:17 PM2018-06-24T17:17:12+5:302018-06-24T17:18:37+5:30
बुलडाणा : ढासळत्या पर्यावरणाची स्थिती सुधारण्यासाठी बुलडाणा वकील संघाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होण्यासाठी एक सकारात्मक उपक्रम सुरू केला आहे
- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : ढासळत्या पर्यावरणाची स्थिती सुधारण्यासाठी बुलडाणा वकील संघाने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण होण्यासाठी एक सकारात्मक उपक्रम सुरू केला आहे. गत् तीन महिन्यापासून जमा केलेल्या विविध प्रकारच्या झाडाच्या बिजाचे राजूर घाटातील महत्त्वाच्या ४०० ठिकाणी रोपण करून २४ जून पासून उपक्रमाला सुरूवात करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. बुलडाणा तालुक्यातील शहरालगत असलेल्या राजूर घाटात बिजरोपण करण्याची संकल्पना गत् तीन महिन्यापूर्वी बुलडाणा बकील संघाचे सदस्य अॅड. संजय बोर्डे, अॅड. श्रीकर व्यवहारे व अॅड. सुशील भालेराव यांनी बुलडाणा जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. राजकुमार देवकर यांचेकडे मांडली होती. अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याने वकील संघाने हा उपक्रम राबविण्यासाठी योजना तयार केली. त्यानुसार अॅड. बोर्डे, अॅड. व्यवहारे व अॅड. भालेराव यांनी मागील तीन महिन्यापासून कडूनिंबाच्या व चिंचोकाच्या बिया जमा करण्यास सुरुवात केली. तीन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर जवळपास २५ ते ३० किलो निंबाच्या बिया व ३ ते ४ किलो चिंचोकाच्या बिया जमा केल्या झाल्या. दरम्यान मागिल काही दिवसापासून बुलडाणा परिसरात रिमझिम पावसाची सुरुवात झाल्यामुळे २४ जून रोजी रविवार सुटीचा फायदा घेवून बुलडाणा वकील संघाचे अध्यक्ष राजकुमार देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी अॅड. संजय बोर्डे, अॅड. सुशिल भालेराव, अॅड. श्रीकर व्यवहारे, अॅड.शेख राज, अॅड. राजेश काशीकर, अॅड.गणेश देशमुख, अॅड. युवराज पाटील, अॅड.अनिल अंभोरे आदींनी राजूर घाटात जवळपास ४०० पेक्षा अधिक विविध ठिकाणी बीजरोपन केले आहे. भविष्यातही जास्ती जास्त ठिकाणी झाडे लावण्यासाठी बिजारोपण करून झाडे टिकविण्यासाठी उपाययोजना करण्याचा मानस बुलडाणा वकील संघाने व्यक्त केला आहे.
सामाजिक जबाबदारी लक्षात घेवून उपक्रम
बुलडाणा शहर २ हजार १९० फुट उंचिवर असल्यामुळे व परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल असल्यामुळे विदर्भातील थंड हवेचे ठिकाणी म्हणून बुलडाणा शहराची ओळख होती. मात्र गत् काही वर्षापासून परिसरातील जंगलातील झाडांची संख्या कमी झाली आहे. राजूर घाटातही मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल झाल्यामुळे कमी प्रमाणात झाडे आहेत. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात बुलडाणा परिसरात मोठ्या प्रमाणात तापमान वाढले. त्याचा शहरातील सर्वसामान्य जनतेला मोठया प्रमाणात त्रास झाला. यापृष्ठभूमिवर बुलडाणा जिल्हा वकील संघाने सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्याचे ठरविले होते
भारतीय झाडे लावण्याचे आवाहन
बुलडाणा वकील संघाने गत् तीन महिन्याच्या परिश्रमानंतर जमा केलेले निंब व चिंचोकाच्या बिया जमा करून राजूर घाटातील जवळपास ४०० ठिकाणी बिजारोपण केले. या घाटांचा परिसरातील नागरिकांना भविष्यात फायदा होण्याच्या दृष्टीकोनातून भारतीय झाडे लावण्याचे आवाहन बुलडाणा वकील संघाने केली आहे. त्यानुसार कदंब, अर्जून, रक्तचंदन, नागकेशर, खैर, पळस, हिरडा, बेहडा, पिंपळी, कडूलिंब, पिंपळ, उंबर, वड, बिल्वपत्र, कैट या झाडांचे वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.
भविष्यातील ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता समाजातील सर्वच घटकांनी मोठ्या प्रमाणात भारतीय वृक्षांचे बिजरोपन व वृक्षारोपण करावे. अॅड.राजकुमार देवकर, अध्यक्ष, वकील संघ,बुलडाणा