सिंदखेडराजा ठाण्यात बिटनिहाय कक्ष स्थापन होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:33 AM2021-03-21T04:33:21+5:302021-03-21T04:33:21+5:30
सिंदखेडराजा : परिसर मोठा परंतु इमारत लहान असल्याने येथील पोलिस स्टेशनचा कारभार साध्या टिन शेडमध्ये करावा लागत आहे. मात्र, ...
सिंदखेडराजा : परिसर मोठा परंतु इमारत लहान असल्याने येथील पोलिस स्टेशनचा कारभार साध्या टिन शेडमध्ये करावा लागत आहे. मात्र, आता पाेलीस स्टेशन इमारतीला लागून भव्य शेड उभारून त्यात बिटनिहाय कक्ष उभारण्यात आल्याने येणाऱ्या अभ्यागतांसह तक्रारदारांना अधिक सुविधा मिळणार आहेत. येत्या काही दिवसात जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन होणार आहे.
पोलीस निरीक्षक जयवंत सातव व सहायक पोलीस अधिकारी यांच्या विचारातून ही संकल्पना मांडली गेली. हे संपूर्ण काम लोक सहभागातून पूर्ण झाले असल्याचे सातव यांनी सांगितले. आलेले तक्रारदार, अभ्यागत यांना स्टेशन इमारतीत जागा अपुरी असल्याने बाहेर मैदानात ताटकळत बसावे लागत होते, तर शांतता कमिटी मीटिंग असो किंवा स्टेशन अंतर्गत घेतले जाणारे कार्यक्रम, इन्स्पेक्शन यासाठी स्वतंत्र पेंडॉल टाकावा लागत होता. आता मात्र भव्य टिन शेड व त्यातच आडगावराजा, जळपिंपळ गाव, धांदरवडी आणि सिंदखेडराजा या चार ठिकाणच्या तक्रारदार किंवा अभ्यागतांना आपल्या ठाणे अमलदारांसोबत स्वतंत्र कक्षात बसून आपले म्हणणे सांगता येणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक बनसोडे यांनी पोलिस स्टेशनला भेट दिली असता त्यांनीही या कामाचे कौतुक केले आहे.