विदर्भ राज्याच्या मुद्यावर भाजपनेही फसवणूक केली - वामनराव चटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 01:55 PM2019-01-05T13:55:48+5:302019-01-05T13:56:23+5:30
बुलडाणा: स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी काँग्रेसनंतर भाजप सरकारनेही फसवणूक केल्याचा आरोप करीत विदर्भ सोडा, अन्यथा खुर्ची खाली करा, असे मत विदर्भ आंदोलनाचे नेते अॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले.
बुलडाणा: स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करण्यासाठी काँग्रेसनंतर भाजप सरकारनेही फसवणूक केल्याचा आरोप करीत विदर्भ सोडा, अन्यथा खुर्ची खाली करा, असे मत विदर्भ आंदोलनाचे नेते अॅड. वामनराव चटप यांनी व्यक्त केले. ते स्थानिक विश्रामगृहावर शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते.
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी विदर्भातील जनतेचे प्रबोधन करण्याकरीता पूर्व विदर्भ व पश्चिम विदर्भ अशा दोन यात्रा काढण्यात आल्या आहेत. २ जानेवारीपासून नागपूर येथून विदर्भ राज्य निर्माण यात्रेला प्रारंभ झाला आहे. ही यात्रा शनिवारी बुलडाणा येथे पोहचली असता विश्राम भवनावर अॅड. वामनराव चटप यांनी संवाद साधला. भाजप सरकारच्या हातात असतानाही स्वतंत्र विदर्भसाठी हालचाली होत नाहीत, विदर्भ आमच्या अजेंड्यावर नाही, असे म्हणून निवडणूकीपूर्वी दिलेले आश्वासन हे सरकार विसरले असल्याचा आरोप चटप यांनी यावेळी केला. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये विदर्भातील १० लोकसभा व ६२ विधानसभेच्या जागा लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी चार विदर्भ वादी संघटना व पाच पक्ष एकत्र आले आहेत. विदर्भाच्या विकासासाठी लोकसभा व विधानसभेची तयारी करण्यात येत असून भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या विरोधात ही निवडणुक लढविणार आहे, असे अॅड. वामनराव चटप यावेळी म्हणाले. पत्रपरिषदेला रंजना मामर्डे, घनश्याम पुरोहित, अॅड. सुरेश वानखेडे, दामोधर शर्मा उपस्थित होते.