भाजप, सेनेचे उमेदवार जाहीर
By admin | Published: October 22, 2016 02:35 AM2016-10-22T02:35:07+5:302016-10-22T02:35:07+5:30
दोन्ही पक्षाकडून वर्तविली जात आहे वाटाघाटीची शक्यता
जळगाव जामोद, दि. २१- भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.डॉ.संजय कुटे यांनी भाजपा कार्यकर्त्यांंंच्या बैठकीत कौल घेत नगरसेवक कैलास डोबे यांच्या पत्नी सीमा डोबे यांची भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी शुक्रवारी जाहीर केली, तर शिवसेनेने विद्यमान नगरसेविका द्रोपदा शालीग्राम हागे यांच्या नावावर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब केले आहे. या दोन्ही पक्षांकडून भविष्यात वाटाघाटी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जळगाव जामोदचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलासाठी राखीव असून, निवडणूक जाहीर झाल्यानंतर या पदासाठी विविध पक्षांकडून कोणत्या महिलांची नावे समोर येतात, याबद्दल मतदारांमध्ये उत्सुकता होती. शुक्रवार, २१ ऑक्टोबर रोजी भाजपाने सीमा कैलास डोबे व शिवसेनेचे द्रोपदाबाई शालीग्राम हागे यांच्या नावाची घोषणा केली. तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उषा संजय ढगे यांचे नाव जाहीर झाल्याचे समजते. विशेष म्हणजे या नगराध्यक्षपदासाठी जाहीर झालेल्या तीनही महिला एकाच समाजाच्या आहेत. भाजपा-सेनेने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शुक्रवारी जाहीर केले असले, तरी नगरसेवक पदाचे उमेदवार मात्र अद्याप कोणी जाहीर केले नाही. काँग्रेससह भारिप-बमसं व समाजवादी पार्टी यांचेही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अद्याप जाहीर होणे बाकी आहे. भविष्यात युती व आघाडी होणार की नाही, याचे उत्तर सध्या देणे कठीण आहे.
निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली असून, नगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याचीही आकडेमोड मतदार करीत आहेत. हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत निवडणुकीच्या वातावरणाने रंगत आणली आहे. शेवटी मतदार कोणाच्या दिशेने कौल देतो, हे मतमोजणीनंतर समजत असले, तरी निश्चित झालेले प्रत्येक उमेदवार आपल्या यशाची शाश्वती देत आहे.