मलकापुरात भाजप शहराध्यक्षास राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 05:47 PM2018-01-25T17:47:50+5:302018-01-25T17:52:13+5:30
मलकापूर : येथील वीर जगदेवराव सहकारी सुतगिरणीचे माजी कार्याध्यक्ष तथा विद्यमान मलकापूर शहर भाजपा अध्यक्ष रामभाऊ झांबरे व त्यांच्या चालकास राष्ट्रवादीचे मोताळा तालुकाध्यक्ष सुनिल घाटे यांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना येथील संताजी नगरात बुधवारी रात्री १० वाजेच्या दरम्यान घडली.
मलकापूर : येथील वीर जगदेवराव सहकारी सुतगिरणीचे माजी कार्याध्यक्ष तथा विद्यमान मलकापूर शहर भाजपा अध्यक्ष रामभाऊ झांबरे व त्यांच्या चालकास राष्ट्रवादीचे मोताळा तालुकाध्यक्ष सुनिल घाटे यांनी लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना येथील संताजी नगरात बुधवारी रात्री १० वाजेच्या दरम्यान घडली. याप्रकरणी सुनिल घाटे यांच्यासह तिघांवर मलकापूर पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल झाले आहेत.
मलकापूरचे भाजप शहराध्यक्ष तथा सुतगिरणीचे माजी कार्याध्यक्ष रामभाऊ झांबरे बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास संताजी नगरातील त्यांच्या मालकीच्या साईराम अपार्टमेंटमध्ये जात होते. ते कार पार्क करुन घरात जाण्यासाठी निघाले असता मोताळा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुनिल घाटे रा.मोताळा, त्यांचा मुलगा व ब्रोकर अनिल अग्रवाल तिथ पोहचले. व त्यांच्यात क्षुल्लक कारणांवरुन वाद झाला. पाहता पाहता त्याच पर्यावसन हाणामारीत झाले. सुरुवातीस झांबरे ह्यांना लोखंडी पाईपाचे वार करण्यात आले. त्यानंतर दोघांपैकी एकाने झांबरे ह्यांना पकडले व उर्वरितांनी जबर मारहाण केली. लाथाबुक्क्याही मारण्यात आल्या, अशी माहिती घटनास्थळी उपस्थितांनी दिली. डोक्यात पाईपचा वार झाल्याने व उजव्या हातावर व पायावर मारहाण झाल्याने गंभीर जखमी अवस्थेत रामभाऊ झांबरे व त्यांचा चालक अजय सुरपाटणे ह्या दोघांना स्थानीय मानस हॉस्पीटलात दाखल करण्यात आले. डॉ.मनोज पाटील यांनी त्यांच्यावर बुधवारी रात्री उशिरापर्यंत उपचार केले. सद्याही दोघे भरती आहेत.
याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अजय जगतराव सुरपाटणे (वय ३८) यांच्या फिर्यादीवरुन सुनिल घाटे, त्यांचा मुलगा व ब्रोकर अनिल अग्रवाल या तीन जणांविरुध्द अपराध नं.२७/१८ कलम ३२३,३२४,५०४,५०६,३४ अन्वये भादवीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी झायलो कारची देखील काचा फोडण्यात आल्या असून सुमारे ३५ हजाराचे नुकसान करण्यात आले आहे. तपास पोहेकॉ गजानन पाटील करीत आहेत.