खामगावातून पोलीस अधिकाऱ्यांना हटवा; भाजपा आमदार आकाश फुंडकर आक्रमक
By सदानंद सिरसाट | Published: August 28, 2022 09:30 PM2022-08-28T21:30:35+5:302022-08-28T21:31:11+5:30
सोमवारी खामगाव बंद, गणेशोत्सवातील बंदोबस्तात काही झाल्यास पोलीसच जबाबदार असतील असाही इशारा
खामगाव: पोळ्याच्या दिवशी झालेल्या दगडफेकीच्या प्रकाराला पोलिसांनी पुरेशी खबरदारी न घेतल्याने तेच जबाबदार आहेत. त्यामुळे येत्या गणेशोत्सवाच्या काळात दडपशाही करण्यासाठी पोलीस मोकळे आहेत, हा प्रकार थांबविण्यासाठी अपर अधीक्षक, उपविभागीय अधिकारी, शिवाजीनगरच्या ठाणेदाराला या काळात खामगावात ठेवू नये, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार अँड. आकाश फुंडकर यांनी रविवारी सायंकाळी पत्रकारांना सांगितले. दगडफेकीच्या घटनेतील निरपराधांवर केलेल्या कारवाईविरोधात उद्या खामगावात बंद पाळला जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
पोळ्याच्या दिवशी झालेल्या दगडफेकीच्या घटनेला पोलीसच जबाबदार आहेत. नागरिकांची प्रचंड गर्दी झाली असताना त्याठिकाणी पुरेसा बंदोबस्त नव्हता. त्यामुळे ही घटना घडली आहे. पोलिसांनी खबरदारी घेतली असती तर हा प्रकार घडला नसता. त्यामुळे या घटनेला अपर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिवाजी नगरचे ठाणेदारच जबाबदार आहेत. त्यांनीच या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यातून येत्या गणेशोत्सवाच्या काळात दडपशाही करण्याची तयारी पोलिसांनी केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोणतीही शांतता भंग झाल्यास पोलीसच जबाबदार असल्याचेही फुंडकर म्हणाले.
पोळ्याच्या मिरवणुकीवर दगडफेक प्रकरणी पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली. त्यामध्ये निरपराध असलेल्यांवर केलेली कारवाई मागे घ्यावी, खामगावातील तीनही अधिकाऱ्यांना गणेशोत्सव काळात शहरात ठेवू नये, तसेच त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
खामगाव बंदची हाक
दगडफेकप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध, तसेच ती मागे घ्यावी, या मागणीसाठी आज, सोमवारी खामगाव शहर बंद ठेवण्याचे आवाहन हिंदुत्ववादी संघटना, गणेश मंडळांकडून करण्यात आले आहे. त्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहनही आमदार फुंडकर यांनी केले आहे.
मनसेचा पाठिंबा
सोमवारी होत असलेल्या खामगाव बंदला मनसेचा पाठिंबा असल्याचे शहर अध्यक्ष आनंद गायगोळ यांनी पत्रकात म्हटले आहे.