धमकीनंतर भाजप आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा वाढवली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 13:58 IST2025-02-26T13:57:25+5:302025-02-26T13:58:17+5:30
यापूर्वी आमदार महाले यांना एका शस्त्रधारी पोलिसाचे संरक्षण होते. मात्र, परिस्थितीच्या गांभीर्यामुळे राज्य सरकारच्या मान्यतेनंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

धमकीनंतर भाजप आमदार श्वेता महाले यांची सुरक्षा वाढवली!
चिखली : भाजप आमदार श्वेता महाले यांना तीन निनावी पत्रांद्वारे जीवघेण्या धमक्या देण्यात आल्या असून, त्यामध्ये अत्यंत क्रूर भाषेचा वापर करत 'सर तन से जुदा' अशा प्रकारची चेतावणी दिली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी आमदार महाले यांच्या सुरक्षेचा आढावा घेत सशस्त्र पोलिस सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
याअंतर्गत, सशस्त्र पोलिस उपनिरीक्षकासह चार पोलिस आणि एस्कॉर्ट वाहन सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आले आहे. यापूर्वी आमदार महाले यांना एका शस्त्रधारी पोलिसाचे संरक्षण होते. मात्र, परिस्थितीच्या गांभीर्यामुळे राज्य सरकारच्या मान्यतेनंतर ही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे मतदारसंघातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे धमकी देणाऱ्या आरोपीचा तातडीने शोध घेऊन सत्य परिस्थिती उघड करावी, अशी मागणी होत आहे.
धमकीप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांचा संताप
धमकी एका विशिष्ट गटाच्या नावाने दिल्याचे पत्रातून स्पष्ट होत असल्याने भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. २१ फेब्रुवारी रोजी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महाले यांच्या निवासस्थानापासून पोलिस ठाण्यापर्यंत रॅली काढून तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सुरक्षाव्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह!
आमदार महाले यांच्या सुरक्षेसाठी तगडी व्यवस्था तैनात करण्यात आली असली, तरी अद्याप आरोपींचा कोणताही माग काढण्यात पोलिसांना यश आलेले नाही. याप्रकरणी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. इतर प्रकरणांत २४ तासांत आरोपींना गजाआड करणारे पोलिस या गंभीर प्रकरणात चार दिवस उलटूनही निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाहीत, यावर कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.