हिंदुत्वाची भाषा भाजपने शिकवू नये : उद्धव ठाकरे

By सदानंद सिरसाट | Published: February 22, 2024 09:44 PM2024-02-22T21:44:00+5:302024-02-22T21:44:56+5:30

...त्यामुळे हिंदुत्वाची भाषा भाजपने आम्हाला शिकवू नये, असा टोला शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव जामोद येथे आयोजित सभेत लगावला.

BJP should not teach the language of Hindutva says Uddhav Thackeray | हिंदुत्वाची भाषा भाजपने शिकवू नये : उद्धव ठाकरे

हिंदुत्वाची भाषा भाजपने शिकवू नये : उद्धव ठाकरे

जळगाव जामोद (बुलढाणा) : हिंदुत्वाची भाषा सर्वप्रथम शिवसेनेने सुरू केली. मुंबईतील जागा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढून ती शिवसेनेच्या उमेदवाराने जिंकली होती. त्यावेळीच भाजपने तो मुद्दा घेऊन पुढील वाटचाल सुरू केली. त्यामुळे हिंदुत्वाची भाषा भाजपने आम्हाला शिकवू नये, असा टोला शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव जामोद येथे आयोजित सभेत लगावला.

सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या माेठ्या आहेत. त्यांना कर्जापायी रात्रीची झोप येत नाही. अतिवृष्टीने खरीप तर अवकाळीने रब्बी हंगाम हातचा गेला. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे. ती देण्याचे काम शासनाचे आहे, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे. या परिसरातील शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता रस्त्यावर येऊन केंद्र शासनाला झुकवण्याची गरज आहे. त्यासाठी आपली लढाई आहे. ती आपणा सर्वांना लढावी लागणार आहे. गुजरात समृद्ध करण्याला आमचा विरोध नाही. मात्र, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये नेऊन नव्हे तर राज्यातील प्रकल्प महाराष्ट्रातच राहण्याची गरज आहे. 

राज्यात पाणीटंचाईचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. या परिस्थितीत उपाययोजनांचीही मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्याकडे शासनकर्त्यांनी लक्ष द्यावे, यासाठी जनतेनेच प्रश्न विचारायला हवेत. शेतकऱ्यांला हमी मिळेल तसेच तो पिकवेल ते विकण्याची व्यवस्था होण्याची गरज आहे. शेतकरी स्वाभिमानी आहे. देशातील कोणताही शेतकरी कर्ज बुडवून परदेशात पळून गेला नाही. त्याचवेळी कर्ज घेऊन पळणाऱ्यांची संख्या देशात मोठी असल्याचेही ते म्हणाले.

हुकूमशाही, एकाधिकारशाहीविरुद्ध लढाई -
आमच्या कुटुंबाबद्दल बाेलले जाते. ते बोला. मात्र, आमची लढाई सुरू असलेल्या एकाधिकारशाही, हुकूमशाहीविरुद्धची आहे. ती लढतच राहू, असा निर्धारही ठाकरे यांनी व्यक्त केला. पुढची पिढी स्वातंत्र्यात ठेवायची असेल तर हुकूमशाहीविरुद्ध सर्वांना लढावं लागणार आहे. ती आपल्या सर्वांची लढाई आहे, असे ते म्हणाले.

छत्रपतींना अभिमान वाटेल असेच काम करा... -
ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. यापुढील काळात अन्याय, अत्याचार, हुकूमशाहीविरुद्ध लढून छत्रपती शिवराय, जिजाऊ, बाळासाहेब ठाकरे यांना अभिमान वाटेल, असेच काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.
 

Web Title: BJP should not teach the language of Hindutva says Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.