भाजपा आध्यात्मिक आघाडीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘दिंडी मोर्चा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:41 AM2021-08-18T04:41:19+5:302021-08-18T04:41:19+5:30
भाजपा आध्यात्मिक आघाडीच्यावतीने आघाडीचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण सीताराम महाराज ठोकळ यांच्या नेतृत्वात १७ ऑगस्ट रोजी स्थानिक भाजपा नेते तथा ...
भाजपा आध्यात्मिक आघाडीच्यावतीने आघाडीचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण सीताराम महाराज ठोकळ यांच्या नेतृत्वात १७ ऑगस्ट रोजी स्थानिक भाजपा नेते तथा माजी आ. विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा दिंडी मोर्चा काढण्यात आला. या दिंडी मोर्चात माजी आ. विजयराज शिंदे तोताराम कायंदे यांची विशेष उपस्थिती होती. दिंडीमध्ये टाळ, मृदंग, वीणा घेऊन भाविक भक्त, भाजपा पदाधिकारी यांनी सहभाग घेतला होता. भाजपा नेत्यांनीसुद्धा गळ्यात टाळ घेऊन भजन अभंग म्हणत,"रामकृष्ण हरी" व "ज्ञानोबा माऊली तुकाराम" असा गजर करत शासनाचे याकडे लक्ष वेधले.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना विजयराज शिंदे म्हणाले की, राज्य सरकारच्या नियमांचा आदर आजपर्यंत भाविकांनी केला. आता भाविकांच्या श्रद्धेचा आदर सरकारने करून सर्वच प्रार्थनास्थळे खुली करावी, अन्यथा भाविक अशीच आंदोलने जिल्हाभर करतील असे सांगितले. आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष हरिभक्त परायण सीतारम ठोकळ महाराज यांनीही तीव्र शब्दात राज्य सरकारवर टीका केली. सरकार दारूची दुकाने उघडत आहे, हॉटेल बार उघडले मग मंदिरांवर बंदी का, असा सवाल त्यांनी उपस्थित करून सरकारने मंदिरे खुली न केल्यास भाविकच आता मंदिरांचे दार उघडतील असा इशारा दिला. या आंदोलनानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना भेटून मागण्यांचे निवेदन दिले.
या आंदोलनात महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सिंधू खेडेकर, तालुकाध्यक्ष सुनील देशमुख, अर्जुन दांडगे, पंढरीनाथ देवकर, नंदिनी साळवे, कडुबा पवार, अलका पाठक, नगरसेवक अरविंद होंडे, मंदार बाहेकर, राजेंद्र पवार यांच्यासह अन्य सहभागी झाले होते.