घाटाखाली भाजपचा दबदबा
By admin | Published: February 24, 2017 02:19 AM2017-02-24T02:19:18+5:302017-02-24T02:19:18+5:30
खामगाव व जळगाव तालुक्यात शत-प्रतिशत भाजप!
बुलडाणा, दि. २३- बुलडाणा जिल्हा घाटाखाली व घाटावर असा विभागला गेला आहे. भौगोलिक व सामाजिक परिस्थितीही या दोन भागात विभागल्या गेली असून, राजकीय समीकरणे वेगवेगळी आहेत. घाटाखाली आधीच बळकट असलेल्या भाजपने जिल्हा परिषद निवडणुकीत आपला दबदबा कायम ठेवला. खामगाव तालुक्यातील सात व जळगाव जामोद तालुक्यातील चार जागा जिंकून जि.प.वर झेंडा फडकण्यात घाटाखालच्या मतदारांची भूमिका निर्णायक ठरली आहे.
भाजपचे जिल्ह्यात तीन आमदार असून, ते सर्व घाटाखाली आहेत. घाटावर काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार आहेत. जि. प. निवडणुकीची धुरा यावेळी कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या खांद्यावर होती. त्यांनी घाटाखाली आ. चैनसुख संचेती व आ. डॉ. संजय कुटे यांच्यासमवेत पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. भापजला घाटावर केवळ सहा जागा मिळाल्या असून, उर्वरित १८ जागा घाटाखालीच मिळाल्या, हे येथे उल्लेखनीय!
भाजप व्यतिरिक्त कुठल्याही पक्षाला घाटाखाली अपेक्षित यश मिळाले नाही. शिवसेनेला दहापैकी केवळ एकच जागा घाटाखाली मिळाली, तर उर्वरित नऊ जागा घाटावर मिळाल्या आहेत. काँग्रेसला घाटाखाली १३ पैकी केवळ तीन जागा मिळाल्या आहेत. भारिपच्या चारपैकी आता केवळ दोन जागा आहेत. भाजपला जिल्हा परिषदेत सर्वात जास्त जागा मिळाल्या असल्या, तरी त्यांना बुलडाणा व लोणार तालुक्यात जिल्हा परिषदेची एकही जागा मिळाली नाही. बुलडाण्यात सहा व लोणार तालुक्यात तीन गट आहेत.