भाजपची जोरदार मुसंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2017 02:21 AM2017-02-24T02:21:31+5:302017-02-24T02:21:31+5:30

बुलडाणा जिल्हा परिषदेत भाजपने ६0 पैकी २४ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे.

The BJP's rigidity | भाजपची जोरदार मुसंडी

भाजपची जोरदार मुसंडी

Next

बुलडाणा, दि. २३-काँग्रेसचा अभेद्य गड समजल्या जाणार्‍या बुलडाणा जिल्हा परिषदेत भाजपने ६0 पैकी २४ जागा जिंकून जोरदार मुसंडी मारली आहे. या पक्षाला पहिल्यांदाच सत्ता स्थापन करण्याची संधी असून, बहुमतासाठी केवळ सात सदस्यांची आवश्यकता आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेची पीछेहाट झाल्याचे चित्र निवडणुकीत स्पष्ट झाले.
जिल्हा परिषदेच्या ६0 गटांसाठी व पंचायत समितीच्या १२0 गणांसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा परिषदेवर कुणाचा झेंडा फडकणार, याबाबत उत्सुकता होती. गुरुवारी सकाळी १0 वाजता १३ तालुक्यांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. गतवेळी केवळ चार जागा असलेल्या भाजपने जोरदार मुसंडी मारत तब्बल २४ जागा पटकावल्या. भाजपच्या संख्याबळात तब्बल सहा पट वाढ झाली आहे. गतवेळी काँग्रेसच्या २२ जागा होत्या. यावेळी काँग्रेसला १३ जागांवर समाधान मानावे लागले. काँग्रेसला नऊ जागांवर पराभव पत्करावा लागला. गतवेळी १४ जागा असलेल्या शिवसेनेचे यावेळी १0 उमेदवार विजयी झाले. शिवसेनेलाही चार जागा गमवाव्या लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसलाही या निवडणुकीत दोन जागांचा फटका बसला आहे. भारिप-बमसंचे गतवेळी चार सदस्य होते. यावेळी भारिपलाही दोन जागांवर पराभवाला सामोरे जावे लागले. भारिपला दोन जागा मिळाल्या. स्वाभिमानी शेतकरी संघटना यावेळी मैदानात उतरली होती; परंतु त्यांना खातेही उघडता आले नाही.
या निवडणुकीत शिवसेनच्या प्रचाराची धुरा सांभाळणार्‍या खासदार प्रतापराव जाधव यांचा मुलगा ऋषी जाधव मेहकर तालुक्यातील डोमरूळ जि.प. गटामध्ये पराभूत झाला. या गटात पूर्वाश्रमीचे कट्टर शिवसैनिक संजय वडतकर यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवून विजय मिळवला, हे विशेष. या निवडणुकीत भाजप बाजी मारेल, असा अंदाज अनेकांनी वर्तविला होता. भाजप वगळता सर्वच पक्षांच्या जागा कमी झाल्या. निकाल जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.

Web Title: The BJP's rigidity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.