योजनेपासून अंध वंचित!
By admin | Published: March 15, 2017 01:17 AM2017-03-15T01:17:31+5:302017-03-15T01:17:31+5:30
शासनाकडून होते दुर्लक्ष; सहा महिन्यांत २२८ अर्जदार ठरले अपात्र
बुलडाणा, दि. १४- जिल्ह्यात गत ५ वर्षात नोंदविण्यात आलेली दिव्यांगांची संख्या १ लाख १८ हजार ७२३ आहे. यात १८ हजार ९६५ अंध नागरिकांचा समावेश आहे. अंध नागरिकांना आधार देण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात; मात्र आरोग्य विभागाच्या विविध कसोट्यांवर खरे न उतरल्यामुळे सहा महिन्यात २२८ दृष्टिदोष असलेल्या नागरिकांना विविध शासकीय सवलतीच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
जिल्ह्यात दिव्यांग आणि दृष्टीदोषांचे खोटे प्रमाणपत्र सादर करून शासकीय सवलती लाटणार्यांची व नोकरी मिळविणार्यांची संख्या मोठी आहे; मात्र खरे अंधांना मात्र अद्यापही प्रशासनाकडून सावत्रपणाची वागणूक दिली जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात दिव्यांग पुनर्वसन केंद्र चालविले जाते. प्रत्येक महिन्याच्या दुसर्या आणि तिसर्या बुधवारी अपंग बोर्डच्यावतीने तपासणी करून अंध व दुष्टीदोष असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येते. गत सहा महिन्यात जिल्ह्याभरातील ५५८ दृष्टीदोष व अंधत्व असलेल्या नागरिकांनी केंद्रांकडे अर्ज केले होते. विविध नियमांच्या कसोट्यांवर पारख करुन ३३0 नागरिकांना अंधत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले, तर निकषात न बसलेल्या २२८ नागरिकांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले, त्यामुळे या नागरिकांना अद्यापही प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे विविध शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.