अंध युवक-युवती विवाह बंधनात!
By admin | Published: March 15, 2017 01:09 AM2017-03-15T01:09:18+5:302017-03-15T01:09:18+5:30
सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने जुळली दोन मने!
चिखली, दि. १४- आयुष्यात प्रत्येक तरूण-तरूणीचे एक स्वप्न असते. ते म्हणजे, योग्य जोडीदार शोधून आपला सुखाचा संसार थाटणं. असेच स्वप्न पाहणार्या एका अंध जोडप्यांना जाती-पातीच्या बंधनात अडकवून न ठेवता त्यांना एकमेकांच्या लग्न बेडीत अडकवून दोघांच्याही जीवनाला डोळस दिशा देण्याचे काम येथील काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने झाले आहे.
स्थानिक गजानन नगर स्थित पंचशील बुध्द विहारमध्ये ६ मार्च रोजी जन्मत: अंध असलेले बंडू खासबागे व कोमल खरात हे दोघे जण विवाह बंधनात अडकले. यातील कोमल ही तालुक्यातील मंगरूळ नवघरे येथील ङ्म्रीधर खरात यांची मुलगी आहे तर बंडू हा मांगुळ झनक ता.रिसोड येथील सूर्यभान खासबागे यांचा मुलगा आहे. अंध असल्यामुळे दोघांच्याही कुटुंबियांना त्यांच्या लग्नाविषयी चिंता वाटत होती. दरम्यान अंध असलेला बंडू हा मंगरूळ नवघरे येथे आपल्यासारख्याच अंध असलेल्या खरात नामक मित्राच्या भेटीला नेहमी येत असतो. या भेटीदरम्यान खरात याने बंडूचा स्वभाव जाणून घेत नात्याने त्याची बहीण असलेल्या कोमलशी बंडूने विवाह करावा, अशी त्याची इच्छा होती. त्यादृष्टीने त्याने प्रयत्न चालविले होते. तसेच कोमल व बंडूची भेट घालून देत संवाद साधल्यानंतर दोघेही लग्नासाठी तयार झाले.
दरम्यान, याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय दाभाडे व किशोर कदम यांना मिळाल्याने या दोघांच्या विवाहासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि बंडू सूर्यभान खासबागे व कोमल श्रीधर खरात या अंध जोडप्याचा आदर्श पद्धतीने विवाह पार पडला. यावेळी अँड. अरूण गवई, प्रीतम मिसाळ, यशवंत शिनगारे, जयदेव मघाडे, संजय पवार, भीमराव जाधव, शेषराव घेवंदे, भारत पवार, युवराज दाभाडे, विशाल दाभाडे, गजानन जाधव, सुधीर जाधव, देवीदास खरात, अंभोरे, वर-वधूकडील नातेनाईक व नागरिकांची बहुसंख्य उपस्थिती होती. या विवाह सोहळय़ासाठी उपस्थित वर्हाडींच्या जेवणाची व्यवस्था संजय दाभाडे यांनी केली. सदर विवाह पार पाडण्यासाठी किशोद कदम, संजय दाभाडे यांच्यासह अंध युवकानेही सक्रिय भूमिका बजाविल्याने अंध कोमल व बंडूच्या जीवनाला एक नवी दिशा मिळाली आहे.