केतकी चितळेचं सोशल मीडिया अकाऊंट कायमस्वरुपी ब्लॉक करा, आता विदर्भातही तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 05:13 PM2022-05-17T17:13:18+5:302022-05-17T17:14:51+5:30
अभिनेत्री केतकी चितळे व एड. नितीन भावे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फेसबुक पोस्ट टाकली होती.
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासंदर्भात अभिनेत्री केतकी चितळे हिने वादग्रस्त फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तुकारामांच्या अभंगातील शब्द घेऊन तसेच संत तुकाराम महाराजांचा एकेरी उल्लेख केला आहे. तसेच, शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर फेसबुक पोस्ट टाकल्याप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात यावी अशी तक्रार संत तुकाराम महाराज कुणबी युवा मंच जिल्हाध्यक्ष विजय इंगळे यांनी शहर पोलीस स्टेशनला दिले आहे.
अभिनेत्री केतकी चितळे व एड. नितीन भावे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फेसबुक पोस्ट टाकली होती. अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून तिने शरद पवार यांचा अपमान केला असल्याचे दिसून आले. त्याचबरोबर पोस्ट टाकत असताना सुरुवातीलाच "तुका म्हणे" म्हणजे तिने तुकाराम महाराजांचा देखील एकेरी उल्लेख करून अपमान केला आहे. हे वाक्य टाकून तिने महाराष्ट्रातील संपूर्ण वारकरी संप्रदायाचे व तमाम जनतेचा अपमान करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. केतकी चितळेसारख्या मुर्ख आणि माथेफिरू व्यक्तींनी भविष्यात अशा प्रकारच्या गोष्टी करू नये, याकरिता तिचे फेसबुक पेज, ट्विटर, इंस्टाग्राम सर्व अकाऊंट आपण कायमस्वरूपी ब्लॉक करावे व तिच्यावर तात्काळ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे, अशी तक्रार संत तुकाराम महाराज कुंबी युवा मंच व संभाजी बिग्रेडच्यावतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता तिला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या, पोलीस अधिक तपास करत आहेत.