मलकापुरात रास्ता रोको : महाविकास आघाडीचे ५० जण स्थानबद्ध..!
By सदानंद सिरसाट | Published: September 3, 2023 02:53 PM2023-09-03T14:53:47+5:302023-09-03T14:54:10+5:30
पोलिसांनी पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून ५० जणांना स्थानबद्ध केले.
मलकापूर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध नोंदवण्यासाठी मलकापुरात महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. रविवारी तहसील चौकात राज्य शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी पदाधिकारी व कार्यकर्ते मिळून ५० जणांना स्थानबद्ध केले.
जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीहल्ला केल्याची घटना घडली. या घटनेनंतर राज्यात पडसाद उमटत आहेत. सकाळी महाविकास आघाडीच्या वतीने येथील नांदुरा रस्त्यावरून निषेध रॅली काढण्यात आली. तहसील चौकात राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत रास्ता रोको करण्यात आला. आंदोलनात काँग्रेसचे नेते हाजी रशीदखा जमादार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोषराव रायपुरे, माजी नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष मंगला पाटील, सोपान शेलकर, मागासवर्गीय सेलचे जिल्हाध्यक्ष प्रमोद अवसलमोल, काँग्रेस तालुकाध्यक्ष बंडूभाऊ चौधरी, शहराध्यक्ष राजू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल झोपे, तालुकाध्यक्ष बाळाभाऊ पाटील, शहराध्यक्ष अरुण अग्रवाल, शिवसेना (उबाठा) शहरप्रमुख गजानन ठोसर, तालुकाप्रमुख दीपक चांबारे, बाजार समितीचे संचालक प्रवीण पाटील, युसूफखान उस्मानखान, जाकीर मेमन, फिरोजखान आदींसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनात पोलिसांनी महाविकास आघाडीच्या ५० जणांना स्थानबद्ध केले व काही काळानंतर सोडून देण्यात आले.