लोणार सरोवर परिसरात वन्यजीव विभागाची नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 11:15 AM2020-06-15T11:15:27+5:302020-06-15T11:15:58+5:30
पक्षी अभयारण्य असलेल्या या सरोवरात काही पर्यटकांकडून विनापरवानगी घुसण्याचा प्रयत्न होत आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पाण्याचा रंग बदलल्याने लोणार सरोवर बघण्यासाठी पर्यकांची येथे मोठी गर्दी होत असून यातूनच राज्यातील सर्वात छोटे पक्षी अभयारण्य असलेल्या या सरोवरात काही पर्यटकांकडून विनापरवानगी घुसण्याचा प्रयत्न होत आहे. त्यानुषंगाने सरोवर परिसरात वन्य जीव विभागाने नाकाबंदी केली असून तीन जणांना अटक केली आहे.
लोणार सरोवर क्षती प्रतिबंध समिती नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेली असून त्यातंर्गत येथे विविध सुधारणा करण्यात येत आहे. सरोवराचे नैसर्गिक अस्तित्व कायम राखण्यासोबतच त्याचे संवर्धन करण्याच्या दृष्टीकोणातून ही समिती कार्यरत असून ९४ कोटी रुपयांचा विकास आराखडाही तयार करण्यात आला आहे.
त्यातूनच आता विना परवानगी लोणार सरोवर अभयारण्यात मज्जाव करण्यात आला आहे. त्यातच आता सरोवराचे पाणी लालसर गुलाबी रंगाचे झाल्याने येथे पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्यांना आवर घालण्यासोबतच सरोवरात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवर वन्यजीव विभागाने आता वॉच ठेवणे सुरू केले असून त्यादृष्टीने येथे नाकाबंदी करण्यात आली आहे.
अशातच १३ जून रोजी सरोवर सोबतच सरोवर परिसरातील चोर वाटाही वन्य जीव विभागाचे स्थानिक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी शोध घेवून बंद कराव्यात अशा सुचना दिल्या आहेत. त्यामुळे सरोवर परिसरात वन्य जीव विभागाची नाकाबंदी सुरू झाली आहे. त्यादृष्टीने महसूल व पोलिस प्रशासनानेही येथील गर्दी व असे प्रकार आता अधिक गांभिर्याने घेण्याची गरज आहे. वन्यजीव विभाग येथे देखरेख करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. त्यामुळे सरोवरात अनधिकृत प्रवेश करणारे त्वरित यंत्रणेच्या निदर्शनास पडत आहे. पर्यटक उत्साहाच्या भरात येथे थेट सरोवरात खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे वन्यजीव विभागाने खबरदारी घेतली आहे.
पाच कॅमेºयाद्वारे वॉच
लोणार सरोवर परिसरात चार हाय डेफीनेशन कॅमेरे व एक पीटीझेड (३६० डिग्रीमध्ये चित्रण करणारा कॅमेरा) कॅमेरा लावण्यात आलेला आहे. पीटीझेड कॅमेºयाचे वैशिष्ट म्हणजे तो चारही दिशेला चित्रण करू शकतो. हायडेफीनेशन कॅमेरा असल्याने दुरवच्या व्यक्ती तथा वस्तूंचे एक्स्ट्रीम क्लोजअप छायाचित्रही त्यामुळे काढणे शक्य आहे.
परवानगीचे देणार नमुने
सरोवर वन्यजीव विभागाच्या अखत्यारित असून सरोवरातील रंग बदललेल्या पाण्याचे नमुने घेण्यासाठी अनेकांकडून विचारणा होत आहे. मात्र वन्यजीव विभागाची परवानगी त्यास आवश्यक असल्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मेळघाट प्रकल्पाचे क्षेत्र संचालक एम. एस. रेड्डी यांनी स्पष्ट केले.
अभयारण्यात अनधिकृत प्रवेश
रंग बदललेले पाणी पाहण्यासाठी येथे अनेक पर्यटक येत आहेत. मात्र नियमांची माहिती नसल्याने ते थेट सरोवरात खाली उतरण्याचा प्रयत्न करत आहे. परवानगी शिवाय सरोवरात जाण्यास मनाई आहे. मात्र त्या उपरही छुप्या मार्गाने पर्यटक जात आहे. त्यांना लगाम घालण्यासाठी आता वनविभागाने कंबर कसरी असली तशा सुचना वरिष्ठस्तरावर देण्यात आल्या आहेत.