बेपत्ता झालेल्या इसमाचा खून
By admin | Published: July 13, 2014 11:37 PM2014-07-13T23:37:27+5:302014-07-13T23:37:27+5:30
अनैतिक संबंधातून भावाने केली हत्या
बुलडाणा : अनैतिक संबंधात अडचण ठरत असलेल्या लहान भावाला मोठय़ा भावानेच १९ मार्च २0१४ रोजी डोंगरखंडळा शिवारातील शेतातील विहिरीत ढकलले, असा खुलासा आज मृतकाच्यय पत्नीने केला. यापूर्वी मृतकाच्या पत्नीने पती ८ दिवस उलटूनही परतले नसल्याची तक्रार बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनला २७ मार्च रोजी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर सदर बेपत्ता इसमाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील विक्रम हरिभाऊ सावळे (७0) हे आपल्या दोन मुलांसोबत राहतात. त्यांचा मोठा मुलगा राम सावळे (३८) आणि मृतक लहान मुलगा लक्ष्मण (३५) होता. काही वर्षांपासून मोठा भाऊ राम याचे लहान भाऊ लक्ष्मण याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते; मात्र काहीच दिवसात या अनैतिक संबंधाबाबत कुटुंबातील लोकांना माहिती झाली. याच कारणातून लक्ष्मण आणि त्याच्या पत्नीत खटके उडू लागले. लहान भाऊ लक्ष्मण या अनैतिक संबंधात अडचणी निर्माण करीत असल्यामुळे मृतकाची पत्नी व मोठा भाऊ राम या दोघांनी मिळून १९ मार्च रोजी लक्ष्मणला शेतातील विहिरीत ढकलून त्याची हत्या केली. शिवाय लक्ष्मण शेगावला दर्शनासाठी गेला असल्याची अफवा गावभर पसरून दिली. याबाबत आठ दिवसानंतर २७ मार्च रोजी वडील विक्रम सावळे यांनी बुलडाणा ग्रामीण पोलिसात लक्ष्मण हरवल्याची तक्रार दिली. या प्रकरणी तपास सुरू असताना लक्ष्मणची हत्या केल्याची कबुली मृतकाच्या पत्नीने पोलिसांपुढे दिली. या प्रकरणी वडील विक्रम सावळे यांच्या तक्रारीवरून भाऊ राम सावळे आणि पत्नी यांच्यावर भादंवि ३0२, २0१ आणि ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला. यात मृतकाच्या पत्नीस १७ जुलैपर्यंत पोलिस कोठडी मिळाली असून, राम सावळे अद्यापही फरार आहे.