दुसऱ्या गुन्ह्यातही चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेचे संचालक मंडळ अटकेत; बुलडाणा सीआयडीची कारवाई
By भगवान वानखेडे | Published: September 29, 2022 07:42 PM2022-09-29T19:42:22+5:302022-09-29T19:42:26+5:30
आर्थिक घोटाळ्यातील नऊ आरोपी पोलीस कोठडीत
बुलडाणा : चंद्रकांत हरी बढे पतसंस्थेतील आर्थिक घोटाळ्याच्या दुसऱ्या प्रकरणाचा बुलडाणा गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी, क्राइम) तपास करुन संचालक मंडळातील नऊ जणांना अटक केली. ही कारवाई २९ सप्टेंबर रोजी करण्यात आली असून, सर्व आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
जळगाव जिल्ह्यातील वरणगाव (ता. भुसावळ) येथील सहकारमित्र चंद्रकांत हरी बढे या पतसंस्थेच्या बुलडाणा शाखेविरुद्ध सन २०१३ मध्ये आर्थिक घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करीत १५ जून रोजी गुन्हे अन्वेषण विभागाने संचालक मंडळाला अटक केली होती. या प्रकरणात आता दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, याच पतसंस्थेच्या बुलडाणा शाखेविरुद्ध २०१५ साली शहर पोलीस स्टेशनमध्ये तत्कालीन लेखापरीक्षक योगीराजसिंग विठ्ठलसिंग राजपूत यांच्या फिर्यादीवरून तीन कर्जदार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
२०१८ मध्ये हा गुन्हा गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग झाल्यानंतर या प्रकरणाचा सखोल तपास करुन गुन्हे अन्वेषण विभागाने २९ सप्टेंबर रोजी या गुन्ह्यातील चेअरमन चंद्रकांत हरी बढे, संचालक गोविंद ज्ञानेश्वर भांडवगणे, बळीराम केशव माळी, भिकू शंकर वंजारी, बळीराम केशव माळी, विजय गणपत वाघ, नामदेव विठ्ठल मोरे, डिगांबर यशवंत सुरवाडे आणि भागवत मुरलीधर पाटील या ९ जणांना अटक केली.
दुसऱ्या गुन्ह्यात २ कोटी २३ लाखांची फसवणूक
२०१३ साली पतसंस्थेविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात फसवणुकीची २ कोटी २० लाख रुपये एवढी रक्कम होती. २०१५ साली दाखल झालेल्या गुन्ह्यातील फसवणुकीची रक्कम ही २ कोटी २३ लाख एवढी आहे.