पुरात वाहून गेलेल्या दोन्ही तरुणांचे मृतदेह सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 01:24 PM2019-11-05T13:24:03+5:302019-11-05T13:24:12+5:30
अवघ्या दोन तासातच वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह चोरप्रांगा शिवारातील तलावात सापडले.
बिबी: येथील मांडवा पुलावरुन वाहून गेलेल्या दोन तरुणांचा शोध घेण्यासाठी धुळे येथील ‘एसडीआरएफ’चे पथक रविवारी रात्री नऊ वाजता बिबी येथे दाखल झाले होते. या पथकात एक अधिकारी व २२ जवानांचा समावेश असून सोमवारी सकाळी ६ वाजता शोध मोहिम सुरु करण्यात आली. दरम्यान, अवघ्या दोन तासातच वाहून गेलेल्या दोघांचे मृतदेह चोरप्रांगा शिवारातील तलावात सापडले. मृतक देऊळगाव कोळ येथील आहेत.
बिबी परिसरात एक नोव्हेंबरच्या रात्री पावसाने नदी-नाल्यांना पूर आले होते. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे येथील मांडवा रोड वरील पुलावरून तीन मोटरसायकल वाहून गेल्या. यातील दोन युवक पुरात वाहून गेले. या तरुणांचा शोध घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी दोन दिवस प्रयत्न करून नदीसह चोरपांग्रा तलाव परिसर पिंजून काढला. परंतु बेपत्ता तरून आढळून आले नाही. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा तहसीलदारांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. दरम्यान, राज्य शासनाकडून धुळे येथून राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची टीम क्रमांक एक रविवारी रात्री नऊ वाजता बिबी येथे दाखल झाली. परंतु रात्रीची वेळ झाल्यामुळे अंधाराचा अडथळा येणार असल्यामुळे शोधकार्य मोहीम सकाळी सहा वाजता सुरू करण्यात आली. तातडीने बोटी तयार करून एस. डी. आर. एफ. पथकाचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे व जवानांनी तलावात शोध कार्याला सुरुवात केली. तासाभरात तलावाच्या मध्यभागी नारायण संतोष गायकवाड (वय ३०) हे मृत अवस्थेत आढळून आले. तर पुढील काही वेळात तलावात असलेल्या एका झाडाच्या झुडपा शेजारी रवी बाबुराव गायकवाड (३५) यांचा मृतदेह तरंगत असलेला आढळून आला. दोघेही देऊळगाव कोळ येथील आहेत. त्यानंतर घटनास्थळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन सानप यांनी शवविच्छेदन केले. तीन दिवसापासून लोणार तहसीलचे नायब तहसिलदार हेमंत पाटील, नागरे नाना, मंडळ अधिकारी पवार, तलाठी गायकवाड, पंढरी उबाळे, ताराचंद भोसले, जमीर यांनी परिश्रम घेतले. देऊळगाव कोळ येथे दोघांचाही अंत्यविधी करण्यात आला. देऊळगाव कोळ सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.(वार्ताहर)