दोन चिमुकल्यांसह मातेचा मृतदेह तलावात आढळला; पिंप्री गवळी येथील लघू प्रकल्पात कुजले मृतदेह
By अनिल गवई | Published: August 26, 2024 09:01 PM2024-08-26T21:01:53+5:302024-08-26T21:02:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : तालुक्यातील पिंप्री गवळी येथील लघू प्रकल्पात दोन चिमुकल्यांसह एका मातेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील पिंप्री गवळी येथील लघू प्रकल्पात दोन चिमुकल्यांसह एका मातेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. हा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला. या प्रकारामुळे खामगाव शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली. खामगाव ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी येथील तलावात सोमवारी सायंकाळी दोन चिमुकल्यांसह मातेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत स्थानिकांना आढळून आला. या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच खामगाव ग्रामीण पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. प्रथमदर्शनी तिन्ही मृतदेह एकमेकांना कपड्याने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे मातेने चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. स्थळ निरीक्षण आणि पंचनाम्यानंतर तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
....
अशी आहेत मृतांची नावे
पार्वती प्रकाश इंगळे (३०)
आर्यन प्रकाश इंगळे (०८)
प्राची प्रकाश इंगळे (०५)
...
आकस्मिक मृत्यूची नोंद
याप्रकरणी मृतक महिलेचे वडील मुरलीधर गोंडू खंडारे (५२) रा. जळका भडंग ह.मु. पिंप्री गवळी यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी बीएनएसएस कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलिस करीत आहेत.
..........
पतीपासून होती विभक्त
मृतक महिला पार्वती इंगळे ही अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथील रहिवासी असून पतीसोबत पटत नसल्याने पिंप्री गवळी येथे राहत होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ती मुलांसह घरून निघून गेली होती. दरम्यान, सोमवारी सायंकाळी मुलांसह या महिलेचा मृतदेह आढळून आला.