संशयास्पद स्थितीत युवकाचा मृतदेह आढळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 12:10 PM2020-08-31T12:10:08+5:302020-08-31T12:10:17+5:30
तेजस दिनकर देशमुख असे मृत युवकाचे नाव असून पुणे येथे तो मध्यंतरी शिक्षण्यासाठी होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: शहरातील साईनगर भागात राहणाऱ्या २४ वर्षीय युवकाचा मृतदेह ३० आॅगस्ट रोजी जिजामातानगर मधील पालिका कॉम्प्लेक्सच्या गाळ््यासमोर आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. संशयास्पद स्थितीत हा मृतदेह सकाळी आढळून आला.
तेजस दिनकर देशमुख असे मृत युवकाचे नाव असून पुणे येथे तो मध्यंतरी शिक्षण्यासाठी होता. मात्र अलिकडील काळात तो बुलडाण्यात परत आला होता. २९ आॅगस्ट रोजी रात्री तो वडिलाां सांगून घराबाहेर गेला होता. मात्र त्यानंतर काही कालावधीनंतर त्याने घरी फोन करून आपल्या हाताला जखम झाल्याचे सांगत डॉक्टरांकडे जात असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्याचे कुटुंबिया जिजामातानगर मधील डॉ. पिंपरकर यांच्या दवाखान्यात आले. मात्र तेजस तिथे आढळून आला नाही. त्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. प्रकरणी त्याचा मोबाईल ट्रॅकवर टाकून त्याचे लोकेशन तपासले असता सकाळी जिजामाता नगरमधील पालिका कॉम्प्लेक्सचा परिसर त्यात समोर आला. तेथे पाहणी केली असता तेजसचा मृतदेह दिसून आला. घटनास्थळापासून जवळच त्याची दुचाकीही आढळून आली. सकाळीच हा प्रकार उघडकीस आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. प्रकरणी बुलडाणा शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृत युवकाचे पार्थिवाचे शवविच्छेदन दुपारी करण्यात आले.
उजव्या हाताची नस होती कापलेली
मृतावस्थेत आढळून आलेल्या तेजस देशमुखच्या हाताची उजव्या हाताची नस कापलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यावर जखम असल्याने पोलिसात सध्या सर्व शक्यतांचा विचार करून तपास करत आहेत. प्रसंगी आत्महत्या किंवा घातपाताची शक्यताही पोलिसांकडून तपासली जात आहे. त्यामुळे मृत युवक डावखुरा होता का? याचीही माहिती पोलिस जाणून घेत आहे. तुर्तास या प्रकरणात स्पष्टपणे काही सांगता येणार नाही मात्र तपासाअंती संपूर्ण घटनाक्रम उघडले असे ठाणेदार प्रदीप सोळंके यांनी बोलताना सांगितले.