बोगस महा ई-सेवा केंद्र शासनाच्या रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 06:47 PM2018-07-08T18:47:40+5:302018-07-08T18:47:48+5:30
आपले सरकार सेवा केंद्राची होणार पडताळणी, २० जुलैपर्यंत द्यावा लागणार करारनामा
ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र धारकांची पडताळणी करण्यात येत असून, त्याकरिता विविध नियम व अटींचा करारनामा आपले सरकार सेवा (महा ई सेवा) केंद्र चालकांना २० जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्यावा लागणार आहे. बोगस महा ई सेवा केंद्र चालक शासनाच्या रडारवर असल्याने आॅनलाईन कागदपत्रासाठी जादा पैसे आकारणे, वेळेवर काम न करणे यासारखे नागरिकांची फसवणूक करणा-या महा ई सेवा केंद्र चालकांना आळा बसणार आहे.
विविध प्रमाणपत्र एका क्लिकवर आॅनलाईन उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने ‘आपले सरकार’ प्रणाली उपलब्ध केलेली आहे. तसेच महा ई सेवा केंद्रावर सुद्धा आॅनलाईन प्रमाणपत्र देण्याची सुविधा आहे. जिल्ह्यात एकूण ३३० महा ई सेवा केंद्र व ६७५ ग्रामपंचायतमधील आपले सरकार सेवा केंद्र असे एकूण १ हजार ५ आपले सरकार सेवा केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रामधून महसूल विभागाच्या सर्व सेवा उपलब्ध आहेत. ही आपले सरकार सेवा केंद्र गावपातळीवरसुद्धा कार्यान्वीत आहेत. जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा (महा ई सेवा) केंद्रधारकांसाठी पडताळणी मोहीम जिल्हाधिकारी कार्यालाच्या सेतू विभागांतर्गत राबविण्यात येत आहे. त्यासाठी आपले सरकार सेवा (महा ई सेवा) केंद्र धारकांना २० जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू विभागाकडे माहिती द्यावी लागणार आहे. सर्व महा ई सेवा केंद्रधारकांकडून करारनामा लिहून घेतला जाणार आहे. मात्र या करारनाम्यातील नियम व अटी पूर्ण न करणाºयांवर कारवाई होणार आहे. अनेक महा ई सेवा केंद्रधारक प्रमाणपत्र देण्यासाठी जादा पैसे आकारतात, वेळेवर प्रमाणपत्र उपलब्ध करून देत नाहीत, यामुळे सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक होते. अशा बोगस महा ई सेवा केंद्रधारकांचे पितळ उघडे पडणार असून सर्व शासकीय सेवेचे दरपत्रक तसेच सेवेचा कालावधी याचे फलक केंद्रावर लावावे लागणार आहे. परिणामी सर्वसामान्यांची फसवणूक करणाºया बोगस महा ई सेवा केंद्रधारकांवर अंकुश बसणार आहे.
अन्यथा महा ई सेवा केंद्र बंद!
विविध नियम व अटींनी भरलेला करारनामा महा ई सेवा केंद्रधारकांनी मुदतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात दिला नाही तर ते महा ई सेवा केंद्र अस्तित्वात नाही, असे समजले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर माहिती सादर न करणाºया महा ई सेवा केंद्राना बंद करण्यात येणार आहे.
केंद्रचालकांना पाळावे लागणार नियम
महा ई सेवा केंद्रधारकांसाठी जिल्हास्तरीय सेतू विभागाने अनेक नियम व अटी घालून दिल्या आहेत. त्यामध्ये शासानाने ठरवून दिलेले दर आकारणे, केंद्रावर दरपत्रक लावणे, कायद्याचा भंग होणार नाही, अत्यावश्यक कारणांसाठी २४ तास सेवा देणे, शासनाच्या वेळोवेळी केलेल्या अटींचे पालन करणे, माहिती चुकीची आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करणे, केंद्र धारक शासकीय किंवा निमशासकीय सेवेत रुजू नसावा यासारख्या विविध नियमांचा समावेश आहे.
आपले सरकार सेवा (महा ई सेवा) केंद्रधारकांना २० जुलैपर्यंत सर्व माहिती कागदपत्रांसह द्यावी लागणार आहे. त्यासाठी केंद्रधारकांना करारनामा उपलब्ध करून देण्यात आला असून माहिती सादर न करणाºयांचे केंद्र बंद करण्यात येतील.
- ललीत वराडे,
निवासी उपजिल्हाधिकारी, बुलडाणा.