घाटाखालील विविध तालुक्यात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:29 AM2017-11-22T00:29:46+5:302017-11-22T00:35:39+5:30
घाटाखालील विविध तालुक्यातील कपाशी पिकावर पांढरी माशी व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तर वातावरणातील बदलामुळे तुरीचेही पीक संकटात सापडल्याचे चित्र आहे. संग्रामपूर तालुक्यातील कपाशी अधिक प्रभावित असल्याचे क्रॉपसॅपच्या पाहणीत आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: घाटाखालील विविध तालुक्यातील कपाशी पिकावर पांढरी माशी व गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. तर वातावरणातील बदलामुळे तुरीचेही पीक संकटात सापडल्याचे चित्र आहे. संग्रामपूर तालुक्यातील कपाशी अधिक प्रभावित असल्याचे क्रॉपसॅपच्या पाहणीत आढळून आले.
गेल्या महिन्यातील ढगाळ वातावरण तसेच तापमानातील तफावत रस शोषक किडीच्या वाढीसाठी अनुकूल असल्यामुळे प्रादुर्भाव वाढला आहे. बिटी कपाशी पिकावर मागील दोन-तीन वर्षांपासून गुलाबी बोंड अळीने कपाशी पिकावर प्रतिकारक्षमता विकसित केली आहे, असे दिसून येते. दरवर्षी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये येणारी गुलाबी बोंडअळी यावर्षी सप्टेंबरमध्येच आढळून आली तरी शेतकरी बांधवांनी आपल्या कपाशी पिकाचे नियमित निरीक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले.
कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) अंतर्गत उपविभागीय कृषी अधिकारी एन.के. राऊत, कीटकनाशक ए.टी. गाभणे, संजय उमाळे, कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद, डी.बी. सवडतकर तालुका कृषी अधिकारी संग्रामपूर, कीड नियंत्रक विलास परिहार कीड सर्वेक्षक, वैभव वाघ, वैभव गाळकर व सोपान सपकाळ यांच्या संयुक्त चमूने पाहणी केली.
असे करावे कीड व्यवस्थापन!
पिवळा रंगाचे चिकट सापळे हेक्टरी २५ ते ३0 लावावीत किंवा जैविक कीटकनाशक ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अँझाडिरेक्टिन १0 हजार पीपीएम, १ किली प्रति लीटर पाण्यातून फवारणी करावी. वरील उपाययोजना केल्यानंतरसुद्धा कपाशी पिकावरील गुलाबी बोंडअळीने व पांढर्या माशीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास खालीलप्रमाणे रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. फेनप्रोप्राथ्रिन १0 ई.सी. १0 मिली किंवा इन्डोक्झिकार्ब १५.८ ईसी, ७ मिली व पांढरी माशीसाइी फ्लोनिकॅमिड ५0 डब्ल्यूजी, २ ग्राम तसेच तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हपी) च्या नियंत्रणासाठी एन्डॉक्झिकार्ब १५.६ ईसी ७ मिली किंवा क्लोरन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के प्रवाही ३ मिली १0 लीटर पाण्यातून फवारणी करावी, असे आवाहन केले आहे.
संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात पाहणी
जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील निंभोरा, खेर्डा, चांगेफळ, रुधाना, वकाना, निवाणा आदी परिसरात कपाशी आणि तूर पिकाची पाहणी करण्यात आली. संग्रामपूर तालुक्यात कपाशीचा १७ हजार ९७१ हेक्टरवर पेरा असून, ५00४ हेक्टरवर तुरीचे क्षेत्र आहे.
ओलिताची शेती व्यवस्था असलेल्या शेतकर्यांनी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी ३१ डिसेंबरनंतर कपाशी पीक शेतातून पूर्णत: नष्ट करावे, जेणेकरून गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम खंडित होईल.
- एन.के. राऊत,
उपविभागीय कृषी अधिकारी, खामगाव