बनावट अकृषक आदेशप्रकरणी बोंद्रे बंधूंना अटक
By admin | Published: July 1, 2017 12:27 AM2017-07-01T00:27:06+5:302017-07-01T00:27:06+5:30
७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी: भूखंड माफियावर कारवाईचा धडाका
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : शहरातील बनावट अकृषक आदेश (एन.ए.आॅर्डर) व्दारे भूखंडांची खरेदी विक्री करून लाखो रूपयांचा मलिदा लाटण्याऱ्या भूखंड माफीयांवर पोलिस कारवाईचा धडाका सुरूच असून या प्रकरणात आतापर्यंत तीघांना अटक होवून पोलिस कोठडी मिळालेली आहे. याच प्रकरणातील उर्वरित १४ भूखंड धारकांपैकी आशिष उर्फ बाळू शरदचंद्र बोंद्रे व विश्वजित जनार्दन बोंद्रे या दोघांनी २९ जून रोजी चिखली पोलिसांत शरणागती पत्करली आहे. दरम्यान चिखली न्यायालयाने या दोघांना ७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.
बनावट अकृषक आदेश प्रकरणी चिखली पोलिसांनी अटक केलेल्या तत्कालीन तलाठी रियाज शेख व उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांच्या कार्यालयातील तत्कालीन स्टेनो विजय गोविंदराव जाधव व त्याचा खासगी एजंट सचिन उर्फ पप्पु दिनकरराव देशमुख या तीघांच्या पोलिस कोठडीत ४ दिवसांची वाढ झाली आहे. तर या प्रकरणातील आणखी दोन भूखंड माफीया आशिष बोंद्रे व विश्वजित बोंद्रे यांनी २९ जून रोजी रात्री उशीरा चिखली पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.
दरम्यान ३० जून रोजी या दोघांना पोलिसांनी न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने या दोघांना ७ जुलै पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. दरम्यान याप्रकरणात अटकेतील बोंद्रे बंधूंनी बनावट अकृषक आदेश कुठे बनविले त्याची माहिती पोलिस कोठडी दरम्यान मिळाल्यानंतर बनावटी साहित्य जप्त करण्याची कारवाई तसेच बनावट आदेशाचा वापर करून या दोघांनी १०५ प्लॉटची विक्री केली की कसे? याचाही शोध घेण्यात येईल आणि या प्रकरणातील इतर आरोपींचे अटकसत्र सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी एपीआय विक्रांत पाटील यांनी दिली आहे.
पालिकेचे ६९ हजार ९०० रूपयांच्या फसवणूक प्रकरणीही गुन्हा दाखल आहे
चिखली पोलिसांसमोर शरणागती पत्करलेल्या बोंद्रे बंधुनी खुद्द नगर पालिकेलाही बनावट अकृषक आदेशाव्दारे भूखंडांची विक्री करण्याचा सौदा करून पालिकेचीही ६९ हजार ९०० रूपयांचे आर्थिक नुकसान करून फसवणूक केली आहे. चिखली नगर पालिकेने खरेदीचा सौदा केलेले भूखंड बोगस कागदपत्राव्दारे झाल्याची तक्रार झाल्यानंतर याबाबतची सत्यता जाणून घेण्यासाठी पालिकेने उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. त्यावरून कागदपत्रांची पडताळणी झाली असता या पालिकेने खरेदी केलेल्या भूखंडाच्या खरेदीखतात वापरण्यात आलेले अकृषक आदेश रे.क.नंबर एनएपी-३४/३८/२०१०-२०११ निकाल दिनांक ६ जुलै २०११ हे प्रकरण उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांच्या कार्यालयात कधीही दाखल करण्यात आलेले नव्हते व नाही, असा निर्वाळा उपविभागीय अधिकारी कार्यालयाने दिला होता. त्यामुळे पालिकेचे ६९ हजार ९०० रूपयांचे आर्थिक नुकसान झाले असून याप्रकरणात पालिकेच्या फिर्यादीवर पोलिसांनी आशिष बोंद्रे व विश्वजित बोंद्रे यांच्या विरूध्द कमल ४२०, ४६८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल आहे.