पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके
By admin | Published: June 17, 2017 12:13 AM2017-06-17T00:13:38+5:302017-06-17T00:13:38+5:30
पुष्पगुच्छ देऊन होणार विद्यार्थ्यांचे स्वागत
जयदेव वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : येत्या २७ जून रोजी जिल्हा परिषद शाळा उघडणार असून, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्याची तयारी सर्वशिक्षा अभियान प्रकल्पाने केली आहे.
जळगाव जामोद तालुक्यामध्ये एकूण १०० शाळा असून काही खासगी शाळा आहेत. यामधील इयत्ता १ ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांची पाठ्यपुस्तके मोफत पुरविली जाणार आहेत. सदर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मोफत पाठ्यपुस्तके न देता त्यांच्या पालकांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा शासनाचा विचार तूर्तास रद्द झाला. त्यामुळे पालकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे, तर शिक्षकांना मात्र पाठ्यपुस्तक वाटपाची जबाबदारी २७ जून रोजी पार पाडावयाची आहे. सर्वशिक्षा अभियान प्रकल्प कार्यालयामार्फत १२ जूनपासूनच केंद्र स्तरावर पाठ्यपुस्तकांचे वाटप पूर्ण झाले असून शाळा स्तरावर शाळेच्या पहिल्या दिवशी वाटप होणार आहे.
पिंपळगाव काळे, खांडवी, आसलगाव, जामोद, खेर्डा, मडाखेड आणि वडशिंगी अशी सात केंदे्र असून, यांतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. सर्व मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळांमध्ये पुस्तकांचा साठा भरला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी पुस्तक वाटपासाठी या शाळा सज्ज झाल्याचे दिसून येते.
सातवीची पुस्तके अद्याप आली नाहीत!
- इयत्ता १ ते ८ करिता ही मोफत पुस्तके असून, सर्व पुस्तके उपलब्ध आहेत; मात्र त्यापैकी इयत्ता सातवीची हिंदी, विज्ञान, भूगोल आणि इयत्ता आठवीची संस्कृत विषयाची पुस्तके अद्याप प्राप्त झालेली नाहीत. ही पुस्तके प्राप्त होताच शाळांना पुरविल्या जातील, असे प्रभारी गटसमन्वयक एम.आर. इंगळे यांनी सांगितले.
- तालुक्यात उर्दू माध्यमाच्याही शाळा आहेत, तसेच सेमी इंग्लिशही बऱ्याच शाळांमध्ये सुरू झाल्याने सेमी इंग्रजीची पुस्तके सध्या उपलब्ध झालेली असल्याची माहिती देण्यात आली तर २७ जून रोजी सर्व शाळांमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येणार आहे.