आत्मनिर्भर पॅकेजअंतर्गत उद्योजकांना १०५ कोटी रुपयांचा बूस्टर डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 10:56 AM2021-06-03T10:56:48+5:302021-06-03T10:56:57+5:30
Buldhana News : ‘आत्मनिर्भर’ पॅकेजअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील लघू उद्योजकांना १०५ कोटी ११ लाख रुपयांचा बूस्टर डोस मिळाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोना संसर्ग आणि गेल्या वर्षी करण्यात आलेले लॉकडाऊन, त्यानंतर दुसऱ्या लाटेदरम्यान लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांचा जिल्ह्यातील लघू व मध्यम उद्योगांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या ‘आत्मनिर्भर’ पॅकेजअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील लघू उद्योजकांना १०५ कोटी ११ लाख रुपयांचा बूस्टर डोस मिळाला आहे.
त्यामुळे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जवळपास २४५ सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी मिशन बिगिन अगेन अंतर्गत अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. त्या दरम्यान, मे, २०२० मध्ये केंद्रीय वित्त मंत्रालयाने देशासाठी २० लाख कोटी रुपयांचे ‘आत्मनिर्भर’ पॅकेज जाहीर केले होते. नंतर पुढे त्याची व्याप्तीही वाढविण्यात येऊन डॉक्टर, वकील सीए यांचाही यात अंतर्भाव करण्यात आला होता. त्यामुळे उद्योग व व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला होता.
या अंतर्गतच जिल्ह्यातील उद्योजक व व्यावसायिकांना हा बूस्टर डोस मिळाला आहे. प्रामुख्याने फेब्रुवारी, २०२० अखरे व्यवसाय, उद्योगांसाठी कर्ज घेतलेल्या व्यावसायिकांचे जेवढे कर्ज बाकी आहे, त्याच्या २० टक्के पतपुरवठा हा विनातारण करण्यात येणार होता. त्यानुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील २ हजार ८६७ व्यावसायिक आणि उद्योजकांना १०५ कोटी ११ लाख रुपयांचे हे विनातारण कर्ज देण्यात आले आहे.
या उद्याेजक तथा व्यावसायिकांना आगामी तीन वर्षांत या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्या वर्षी घेतलेल्या कर्जापोटी फक्त व्याजच द्यावे लागणार आहे. उर्वरित कर्जाचे हप्ते फेडता येतील, असेही जिल्हा अग्रणी बँकेच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. गेल्या वर्षी १ एप्रिल, २०२० ते ३१ मार्च, २०२१ या कालावधीत जिल्ह्यातील उद्योजक तथा व्यावसायिकांना हा पतपुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे उद्योजकांचे अर्थकारण रुळावर येण्यास काही प्रमाणात मदत झाली.