घर दोघांचे, पण नोंदणी पुरुषांच्याच नावे!
By Admin | Published: March 8, 2016 02:34 AM2016-03-08T02:34:32+5:302016-03-08T02:34:32+5:30
सातबा-यावरही नाव देण्याची मागणी; ग्रामविकास मंत्रालयाच्या परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी नाही.
बुलडाणा : घर दोघांचे असते ते दोघांनी सावरायचे असते..एकाने पसरवले तर दुसर्याने आवरायचे असते..अशा अनेक ओळींनी घरामध्ये पतिपत्नीचे महत्त्व अधोरेखित केले जाते. हे घर दोघांचे असले तरी घराची नोंदणी मात्र पुरुषांच्याच नावावर असण्याचा प्रकार सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे पतीच्या मालमत्तेत हक्क देतानाच स्त्रियांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी घर दोघांच्या नावे करण्यात यावे, असे परिपत्रक राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने २0१३ मध्ये काढले होते, त्या परिपत्रकाचीही पूर्णपणे अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याने अनेक गावांमध्ये महिलांना आर्थिक सुरक्षितता देण्याच्या दृष्टीने केलेला हा प्रयत्न प्रशासकीय उदासीनतेमुळे यशस्वी झाला नाही. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन परिपत्रक क्र.व्ही.पी.एम. २६0३/प्र.क्र. २0६८ मंत्रालय मुंबई दि.२0 नोव्हेंबर २00३ रोजी प्रसिद्ध करून घर दोघांच्या नावाने करण्याबाबत सूचित केले होते; मात्र या परिपत्रकांची अजूनही जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी पूर्तता केलेली नाही. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी नमुना आठ वर नोंद घेताना पती-पत्नीच्या नावाची नोंद घेतली आहे; मात्र घर विकताना महिलेची संमती गृहित धरली जात असल्याने महिला सुरक्षिततेच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. अनेकदा पतीच्या निधनानंतर पतीच्या मालमत्तेमध्ये हक्क प्रस्तापित करताना महिलांना अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते. जर आधीच पती-पत्नीच्या नावांची नोंद महसुली दप्तरात असेल तर अशा अडचणी येऊ नये, हा शासनाचा उद्देश आहे. शासनाच्या महिलाविषयक धोरणांची अंमलबजावणी पूर्णपणे झाली तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.