दारूची अवैध वाहतूक करणा-या दोघांना अटक
By admin | Published: March 4, 2017 02:19 AM2017-03-04T02:19:04+5:302017-03-04T02:19:04+5:30
७७ हजारांचा मुद्देमाल जप्त.
चिखली(जि. बुलडाणा), दि. ३- राज्य उत्पादन शुल्क विभागाने लोणार तालुक्यात सापळा रचून, एका चारचाकी वाहनातून अवैधरीत्या नेल्या जाणारी देशी व विदेशी मद्यसाठय़ासह सुमारे ७७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. सदरची कारवाई लोणार-हिरडव मार्गावर २ मार्च रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
लोणार महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने विशेष खबरदारी घेण्यात येत असून, २ मार्च रोजी उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून लोणार - हिरडव मार्गावर पाळत ठेवून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत होती. दरम्यान, दुपारी १२ वाजेच्या सुमारास एम.एच.0३ के.४९१८ या मारूती ८00 ची तपासणी केली असता त्यामध्ये देशी व विदेशी दारू आढळून आल्याने याप्रकरणी गणेश सोनुने व गणेश चाटे दोघे.रा.लोणार यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून देशी दारूचे पाच बॉक्स व विदेशी दारू असलेला एक बॉक्स व वाहन, असे एकूण ७७ हजार ५५0 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कारवाई मेहकर दुय्यम निरीक्षक जी.आर. गावंडे, चिखली दुय्यम निरीक्षक टी.जी. लव्हाळे, कॉन्स्टेबल एस.डी. जाधव, पी.एस. देशमुख, एन.ए. देशमुख यांनी केली आहे.