खामगावमधील नवजात बालकाच्या अपहरण प्रकरणी दोघे ताब्यात; आरोपींची दोन तास कसून चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 03:57 PM2017-09-30T15:57:25+5:302017-09-30T16:00:12+5:30
उप जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकाच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी शनिवारी दोघांना ताब्यात घेतले.
खामगाव: येथील उप जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकाच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी शनिवारी दोघांना ताब्यात घेतले. यात एका महिलेचा समावेश असून दोघांचीही कसून चौकशी करण्यात आली. तर ताब्यातील दोघांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी एक पथक रवाना केले.
नांदुरा तालुक्यातील वड्नेर भोलजी येथील सुमैय्या परवीन यांच्या पाच दिवसाचे बाळ २७ सप्टेंबरच्या पहाटे एका बुरखाधारी महिलेने पळविले. हा खळबळ जनक प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी वेगाने चौकशी सुरु केली. आज दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे नवजात बालकाच्या तपासाला गती मिळणार आहे.
नेमकं काय घडलं होतं ?
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रात्री तीन वाजताच्या सुमारास एका बुरखाधारी महिलेने दोन दिवसाचे मुल पळविले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली. सुमय्या बी नामक महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर बाळ व बाळंतीण यांना उपजिल्हा रुग्णालयाच्या वार्ड नं ५ मध्ये भरती ठेवण्यात आलं होतं. रात्री ३ वाजताच्या सुमारास एक बुरखाधारी महिला व तिच्या सोबत असलेला मुलगा इंडिका कारमधून रुग्णालयात दाखल झाले व पाच दिवसाच्या मुलास उचलून घेऊन पोबारा केला.
ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे घटनेची माहिती मिळताच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ निलेश टापरे हे रात्री ३:३० वा रुग्णालयात दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी महिले विरोधात गुन्हा दाखल केला.