लस घेतलेल्या दोघांना झाला कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:06 AM2021-02-21T05:06:23+5:302021-02-21T05:06:23+5:30
कोविड या साथरोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी कोविशिल्ड या लसीकरणाला १६ जानेवारीपासून जिल्ह्यात सुरुवात झालेली ...
कोविड या साथरोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी कोविशिल्ड या लसीकरणाला १६ जानेवारीपासून जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे. लसीकरण सत्रात पहिली लस बुलडाणा येथील डॉ.सोनाली मुंढे-इलग यांना देण्यात आली होती. या दिवशी ५७५ नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात आली होती. लस घेतल्यानंतरही मास्क लावणे, वारंवार हात धुणे व सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सुरुवातीला बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय, शेगाव, देऊळगाव राजा, खामगाव, चिखली व मलकापूर येथे लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती.
त्यानंतर टप्प्या टप्प्याने लसीकरणाच्या केंद्रामध्ये वाढ करण्यात आली. परंतू लस घेतल्यानंतरह आतापर्यंत दोन जणांना कोरोनाची लागन झाल्याचा प्रकार समोरा आला आहे. त्यामध्ये डोगणाव येथील वैद्यकीय अधिकारी व दुसरा खामगाव येथील आरोग्य कर्मचारी लस घेतल्यानंतर कोरोना पाॅझिटिव्ह सापडला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात दीडशेपेक्षा अधिक लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील लस देण्यात आली आहे.
जिल्ह्यात कोविशिल्डचे ३६ हजार ५०० आणि कोव्हॅक्सिनचे ७ हजार १०० असे ४३ हजार ३०० डोस उपलब्ध करण्यात आले आहेत.
कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर, दुसरा डोस २८ दिवसांनी घ्यावा लागतो. त्यानंतर शरीरात ॲन्टीबाॅडीज तयार होतात. दोन्ही डोस घेण्याच्या दरम्यानच्या या कालावधीमध्ये कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
-डाॅ. नितीन तडस,
जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा
१३०० दररोजचे लसीकरणाचे उद्दिष्ट
कोविड लसीकरण जिल्ह्यात सुरू असून, सध्या १३ ठिकाणी हे लसीकरण होत आहे. प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे १ हजार ३०० लसीकरणाचे दररोजचे उद्दिष्ट आहे. कोविड लसीकरणामध्ये दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाइन वर्करमधील व्यक्तींचे लसीकरण सध्या सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे.
लस घेतल्यानंतर चार तास विश्रांती आवश्यक
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले असले, तरी ही लस घेतल्यानंतर अस्वस्थ वाटणे, मळमळ, उलट्या होण्याचा त्रास जाणवतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर किमान चार तास विश्रांती घेणे आवश्यक आहे, शिवाय फिजिकल डिस्टन्सिंग राखणे, तोंडाला मास्क बांधणे, सॅनिटायझरचा वापर करणेही आवश्यक असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.