सावखेड तेजनवासीयांचा मतदानावर बहिष्कार
By admin | Published: October 2, 2014 11:46 PM2014-10-02T23:46:05+5:302014-10-03T00:00:35+5:30
सिंदखेडराजा तालुक्यातील सावखेड तेजन- उमरद पांदन रस्त्याचा प्रश्न.
सिंदखेडराजा (बुलडाणा) : तालुक्यातील सावखेड तेजन ते उमरद हा पांदन रस्ता कित्येक दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे शेतकर्यांना अडचणी निर्माण होत असून, सदर रस्ता खुला न झाल्यास विधानसभा मतदानावर बहिष्कार टाकणार, असा इशारा सावखेड तेजनवासीयांनी निवडणूक निर्णय अधिकार्यांना दिला आहे.
सावखेड तेजन ते उमरद पांदन रस्ता कित्येक दिवसांपासनू बंद आहे. त्यामुळे शेतकर्यांना आपल्या शेतापर्यंत जाणे अवघड होऊन बसले आहे. सदर रस्ता खुला करून देण्यात यावा, यासाठी सावखेड तेजन येथील ग्रामस्थांनी ३0 ऑगस्ट रोजी तहसीलदारांकडे मागणी केली होती. त्यावेळी तहसीलदारांनी सदर पांदन रस्ता आठ दिवसांच्या आत खुला करून देण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु रस्ता खुला करून देण्यात आलेला नाही.
त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी मंडळ अधिकारी व तलाठी यांनी स्थळ निरीक्षण करून हा रस्ता वडिलो पाजिर्त असल्याचा अहवाल तहसील कार्यालयाला सादर केला आहे. सावखेड तेजन ते उमरद हा पांदन रस्ता ८ ऑक्टोबरपर्यंत खुला न झाल्यास विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा सावखेड तेजनवासीयांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे.